सगळ्यांची लाडकी दिवाळी चार दिवसांवर येऊन ठेपलीय. ऐन सणाला सुट्टी मिळावी म्हणून मराठी मालिकांच्या सेटवरही शूटिंगची एकच लगबग सुरू आहे. कुठे डबल शिफ्ट केली जातेय, तर कुठे सेटवरच दिवाळी साजरी केली जातेय…
दिवाळीच्या दिवसांत सुट्टी मिळावी म्हणून टीव्ही मालिकांच्या सेटवर आतापासूनच कामाची लगबग सुरू आहे. एपिसोड्सची बँक तयार करून ठेवण्यासाठी दिवस-रात्र शूटिंग केलं जातंय. अनेक ठिकाणी सध्या डबल शिफ्टमध्ये काम होतंय. या दरम्यान कलाकारांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, त्याऐवजी पुढे दिवाळीत त्यांना सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे एकूणच मराठी मालिकांच्या सेटवर दीपावलीनिमित्त धावपळ पाहायला मिळतेय.
काही मालिकांच्या कथानकात दिवाळी साजरी करताना दाखवण्यात येणार आहे. काहींच्या प्रोडक्शन टीमनं कलाकारांना ब्रेक मिळावा यासाठी ऑफस्क्रीन दिवाळीचे खास कार्यक्रम आखलेत. फटाक्यांविना इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यावर प्रत्येक सेटवर भर दिला जातोय.