नागपूर : श्रीलंकेविरुद्धच्या कोलकाता कसोटीत पाऊस आणि अंधारामुळे अधुरं राहिलेलं विजयाचं स्वप्न टीम इंडियानं आज नागपूरमध्ये साकार करून दाखवलं. फलंदाजांनी धू-धू धुतल्यानंतर फिरकीपटूंच्या गिरकीच्या जोरावर श्रीलंकेला ‘एक डाव धोबीपछाड’ देत भारतानं विराट विजय साकारला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
कर्णधार विराट कोहलीचं तडाखेबंद द्विशतक आणि मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा या त्रिकुटाच्या शतकांमुळे भारतानं पहिल्या डावात ४०५ धावांची भरभक्कम आघाडी घेतली होती. ती पाहून श्रीलंकेला जणू ‘४०५ व्होल्ट’चा झटकाच बसला. पहिल्या डावात त्यांची २०५ धावांत दाणादाण उडाली होती. त्यामुळे आज चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा, विशेषतः फिरकीचा सामना करणं त्यांच्यासाठी महाकठीण होतं. या दबावाखालीच लंकेचे शिलेदार मैदानावर उतरले, फिरकीच्या जाळ्यात अडकले आणि सरतेशेवटी एक डाव आणि २३९ धावांनी पराभूत झाले. कर्णधार दिनेश चंडिमलने अर्धशतकी खेळी केली, पण पराभव लांबवण्याइतकाच तिचा उपयोग झाला.
१ बाद २१ या कालच्या धावसंख्येवरून श्रीलंकेनं आपला डाव पुढे सुरू केला. डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना आणखी ३८४ धावा कराव्या लागणार होत्या. पण, रवींद्र जाडेजा आणि आर. अश्विन जोडीनं फलंदाजांना फार काळ पीचवर टिकूच दिलं नाही. चंडीमल वगळता मधली फळी सपशेल अपयशी ठरली. लंकेची अवस्था ५ बाद ७५ अशी होऊन गेली. त्यानंतर चंडीमलनं दासून शनाकाला सोबत घेऊन संघाला ‘शंभरी’ ओलांडून दिली. शेवटी शेवटी सुरंगा लकमलनं त्याला दिलेल्या साथीमुळे लंकेला १६६ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताचा धावांचा डोंगर चढणं त्यांना अजिबातच झेपलं नाही.