गणेश विसर्जनावेळी डीजेचा दणदणाट नाहीच

140
702

मुंबई: गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे वाजवण्यास उच्च न्यायालयाने घातलेली बंदी कायम ठेवली आहे. त्यामुळे यंदा गणेश विसर्जनावेळी डीजेचा दणदणाट होणार नाही. ध्वनी प्रदुषणाचे कारण देत न्यायालयाने ही परवानगी नाकारली असून ‘पाला’ या संघटनेस दिलासा देण्यास नकार दिला आहे.

मुंबई हायकोर्टात आज याप्रकरणी सुनावणी करण्यात आली. ध्वनी प्रदुषणाच्या मुद्यावरून डीजे साउंड सिस्टिमला सार्वजनिक ठिकाणांवर परवानगी देणे अशक्य असल्याची भूमिका राज्य सरकारने मांडली होती. न्यायालयाने सरकारची ही भूमिका ग्राह्य धरली आहे.

‘ध्वनी प्रदूषण प्रतिबंधक नियमावलीप्रमाणे वातावरणातील आवाजाच्या मर्यादेतच राहील इतपत आवाजाची निर्मिती करणाऱ्या डीजे साउंड सिस्टीमचीही निर्मिती करता येते, हे पटवून देण्यात याचिकाकर्ते अपयशी ठरले. तर गेल्या वर्षी ध्वनी प्रदूषणाच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक ७५ टक्के प्रकरणे डीजे साउंड सिस्टीमची होती, तसेच डीजे साउंड सिस्टीम सुरू करताच त्याचा आवाज ५० ते ७५ डेसिबल मर्यादेबाहेर जाऊन जवळपास १०० डेसिबलपासून सुरू होतो, असे राज्य सरकारने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांवर त्याच्या वापरास मनाई करण्याची राज्य सरकारची भूमिका आम्ही मान्य करतो’, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शंतनू केमकर व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने डीजेवरील बंदी उठवण्यात नकार दिला.

तर ‘पाला’ या संघटनेने गणेशोत्सवपुरता तातडीने अंतरिम दिलासा देण्याची विनंती कोर्टाला केली. मात्र खंडपीठाने ही विनंती फेटाळून लावणारा निर्णय अंतरिम आदेशात दिला. या अंतरिम आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागता यावी यासाठी संघटनेने त्याला तात्पुरती स्थगिती देण्याचीही विनंती केली. त्याला राज्य सरकारने विरोध दर्शवला. त्यानंतर खंडपीठाने ती विनंतीही फेटाळली आणि याचिकेवरील अंतिम सुनावणी चार आठवड्यांनी ठेवली. त्यामुळे यंदाच्या गणेश विसर्जनावेळी डीजेचा दणदणाट होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

140 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here