मुंबई: राजकारणाशिवाय मी काहीही करू शकत नाही, असं सांगतानाच तुमची परवानगी असेल तर मी विधानसभेची निवडणूक लढवणार, असं सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभेतून स्वत:ची उमेदवारी आज घोषित केली. या निमित्ताने निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती आहे. आदित्य यांनी त्यांची उमेदवारी घोषित केल्याने मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत उतरल्याचे संकेतही शिवसेनेने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

वरळीत लाला लजपतराय महाविद्यालयात शिवसेनेचा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना आदित्य ठाकरे यांनी वरळीतून त्यांची उमेदवारी घोषित केली. यावेळी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते. आदित्य यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करताच शिवसैनिकांनी जय शिवाजी, जय भवानी आणि आदित्य ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैच्या घोषणा दिल्या. राजकारणाशिवाय मी काहीही करू शकत नाही. पण तुमची परवानगी असेल तर शिवरायांच्या आणि सर्व महापुरुषांच्या साक्षीने निवडणूक लढवणार असल्याचं आदित्य यांनी सांगितलं. मुख्यमंत्री, आमदार बनण्यासाठी किंवा माझं स्वप्न साकार करण्यासाठी मी निवडणूक लढवणार नाही. तर मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. वरळीला जागतिक पातळीवर न्यायचे आहे. राजकारणात असल्यास एका निर्णयामुळे तुम्ही लाखो लोकांचं भविष्य घडवू शकता. त्यामुळेच मी निवडणुकीला उभा राहत आहे, असं आदित्य यांनी सांगितले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी असल्यानेच मी निवडणुकीला उभा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.