माजी आमदार देवेंद्र साटम बंडाच्या तयारीत ?

0
98

कर्जत :

   कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार आणि सध्याचे भाजपचे नेते असलेले देवेंद्र साटम हे बंडाच्या तयारीत आहेत. साटम हे अपक्ष उमेदवार अर्ज भरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान साटम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास या मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असून महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र थोरवें पुढे साटम यांचे आव्हान कसे असणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

कर्जत खालापूर मतदारसंघाकडे संबंध जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारण विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून या मतदारसंघात रोज नवीन घडामोडी व राजकीय भूकंप घडत आहे. या भूकंपाने येथील भल्याभल्या मातबरांच्या पायाखालची  जमीन सरकत असल्याचे दिसत आहे. युतीचा तिढा राज्यात आता सुटला असतानाच रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारा विरोधात भाजपचे नेते बंड करून उभे ठाकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कर्जत खालापूर मतदारसंघात 30 सप्टेंबर रोजी शिवसेनेकडून माजी उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्याचदिवशी थोरवे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला होता. थोरवे यांनी उमेदवार म्हणून आपल्या हालचाली सुरू केल्या असतानाच महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे येथील नेते असलेले माजी आमदार देवेंद्र साटम हे आता आपली अपक्ष उमेदवारी दाखल करत असल्याचे समजत आहे. साटम यांना शिवसेनेतून भाजप मध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर जिल्ह्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी साटम हे आगामी विधानसभा निवडणुकीत कर्जत खालापूरचे उमेदवार असल्याचे जाहीर केले होते. मात्र हा मतदारसंघ महायुती असल्याने सेनेकडे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुक लढण्यास इच्छुक असलेले माजी आमदार देवेंद्र साटम हे आता अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे.

मी कर्जत खालापूर मतदारसंघातील विधानसभा निवडणूक लढणार हे खरे आहे. ही निवडणूक लढण्याची इच्छा मी खूप अगोदर भरतीय जनता पक्षाच्या पक्ष श्रेष्ठींकडे व्यक्त केली होती. ही निवडणूक मी पक्षाकडून लढतोय की अपक्ष हे मी आता सांगू शकत नाही. मात्र पक्षाचा आदेश हा माझ्यासाठी अंतिम असेल हे देखील तितकेच खरे आहे – देवेंद्र साटम-माजी आमदार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here