मुंबई:

 संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या २४ ऑक्टोबर रोजी लागणार आहेत. विधानसभेच्या २८८ जागांसह साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी राज्यात २५ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतमोजणी केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने २८८ जागांच्या मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे. उद्या सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राज्यातील २६९ ठिकाणी २८८ केंद्रांवर ही मतमोजनी होणार आहे. प्रत्येक मतदारसंघात केंद्राच्या संख्येवर मतमोजणीसाठी १४ ते २० टेबल ठेवण्यात येणार आहेत. यावेळी उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्येक टेबलवरील मतमोजणी दरम्यान उपस्थित राहण्याची मुभा देण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षकही उपस्थित राहणार आहेत. उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केल्यास फेरमतमोजणी करण्याचा निर्णय निवडणूक अधिकारी घेणार असल्याचं राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी सांगितलं.