महाड :
महाड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आमदार श्री भरत गोगावले यांचा जलवा कायम राहत विजयाची हॅट्रिक केली आहे. आपला सलग तिसरा विजय नोंदविताना काँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांचा त्यांनी तिसऱ्यांदा पराभव करीत जगताप यांच्या पराभवाची देखील हॅट्रिक केली. भरत गोगावले यांनी २१ हजार २५६ मतांची आघाडी घेत श्री जगताप यांना पराभूत केले. आमदार गोगावले यांना १ लाख १ हजार ३७० तर माणिक जगताप यांना ८० हजार ११४ मते मिळाली. आ. गोगावले यांच्या या विजयांनंतर मतमोजणी केंद्राच्या परिसरात संपूर्ण मतदार संघात शिवसैनिकांनी विजयोत्सव साजरा केला. निवडणुकीच्या रिंगणात असलेले अन्य उमेदवार मात्र आपला कोणताही प्रभाव पाडू शकले नाहीत. आज सकाळी ८ वाजता महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात या मतमोजणीला प्रारंभ झाला. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आ. गोगावले यांनी माणिक जगताप यांच्यावर आघाडी घेण्यास प्रारंभ केला. ते शेवटच्या फेरी अखेर आ. गोगावले यांनी आपली आघाडी वाढवीत नेत विजय संपादन केला. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या अन्य उमेदवारांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवेंद्र गायकवाड यांना २ हजार २२५ बहुजन मुक्ती मोर्चाचे आशिष जाधव यांना ६६८ वंचित बहुजन आघाडीचे संजय घाग यांना १ हजार १९६ अपक्ष अशोक जंगले यांना २४२ अपक्ष चंद्रकांत धोंडगे १ हजार १६२ तर अपक्ष लक्ष्मण निंबाळकर २७६ मते मिळाली. २ हजार ७३ मतदारांनी नोटाचा अधिकार वापरला. बारा वाजण्याच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी अंतिम निकाल जाहीर करीत शिवसेनेचे उमेदवार भरत गोगावले हे निवडून आल्याचे जाहीर केले. त्यांनंतर मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी एकच जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी करीत विजयोत्सव साजरा केला. सर्व प्रथम गोगावले यांनी मतमोजणी केंद्राबाहेर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले यानंतर आमदार भरतशेठ गोगावले यांनी महाड शहरातील शिवाजी चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून सामान्य कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत विजयाचा गुलाल उधळला आला रे आला शिवसेनेचा वाघ आला , दसरा दिवाळी एकच भेट पुन्हा आमचे भरत शेठ अशा जयघोषांनी महाड शहर दुमदुमून निघाले होते. संपूर्ण महाड विधानसभा मतदार संघात सायंकाळपर्यंत शिवसैनिकांचा जल्लोषात विजयोत्सव सुरु होता.