मुंबई :

शिवाजी पार्क परिसरात लावलेले पक्षाचे झेंडे, कंदिल आणि बॅनरविरोधात कारवाई करणाऱ्या सहायक आयुक्तांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ केल्याप्रकरणी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अन्य सात ते आठ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर देशपांडे आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. शिवाजी पार्क परिसरात दिवाळीनिमित्त कंदील आणि तसंच बॅनर लावण्यात आले होते. त्याविरोधात महापालिकेनं कारवाई हाती घेतली होती. ही कारवाई सुरू असताना, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जी/उत्तरच्या सहायक आयुक्त दिघावकर यांना फोन करून कारवाई थांबवण्याची मागणी केली. तसंच त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले आणि शिवीगाळही केली. तसंच कारवाई सुरू असताना देशपांडे आणि इतर कार्यकर्ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सहायक आयुक्तांना शिवीगाळ केली. आमच्या पक्षाचे कंदिल आणि झेंडे काढण्याची कारवाई थांबवावी, असं सांगून त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, आज दुपारी एक वाजताच्या सुमारास देशपांडे आणि सात ते आठ कार्यकर्ते सहायक आयुक्तांच्या दालनाकडे येत होते. परवानगी न घेतल्यानं त्यांना प्रवेश नाकारला. मात्र, त्यांनी धक्काबुक्की करत जबरदस्ती सहायक आयुक्तांच्या दालनात प्रवेश केला. पक्षाचे कंदील आणि झेंडे हटवल्यामुळं त्यांनी त्यांच्याशी वाद घातला आणि शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रारही अधिकाऱ्यांनी दिली.