मुंबई : अंधेरी साकीनाका येथील खैरानी रोडवरील औद्योगिक गाळ्याला शुक्रवारी सायंकाळी आग लागली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण अजून बेपत्ता आहे. दोन मृतांमध्ये एका महिलेचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत.

साकीनाका येथे केमिकलचे गाळे, लाकडाचे कारखाने दाटीवाटीने असल्याने ही आग अल्पवधीत भडकली आणि जवळच असलेल्या झोपड्यांपर्यंत पसरली. आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी सुमारे ३० ते ३५ गोदामे जळून खाक झाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

साकीनाका येथील खैरानी रोडवर अनेक व्यावसायिक गाळे आणि इंडस्ट्री आहेत. जंगलेश्वर मंदिराजवळच्या दोन गाळ्यांना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आग लागली. दाटीवाटीचा परिसर, रसायने आणि लाकडांची गोदामे आणि त्यातच लागूनच अनेक झोपड्या असल्याने काही वेळातच आगीचा भडका उडाला. रसायने आणि लाकूड यांसारख्या ज्वलनशील पदार्थांमुळे आगीच्या प्रचंड ज्वाळा उठल्या. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले. नऊ फायर इंजिन, दोन शीघ्र प्रतिसाद वाहने, चार आगीचे बंब, एक सीपी आणि नऊ जंबो टँकरने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. मात्र दाटीवाटीचा भाग असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. आगीची वाढती तीव्रता पाहता बीपीसीएल, एचपीसीएल, पालिका कर्मचारी व इतर यंत्रणांनाही मदतकार्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले.