पनवेल :

     एलएनटी कंपनीमध्ये व्यवस्थापक असल्याचे भासवून नोकरीला लावण्याचे अमिष देऊन महाराष्ट्रातील इतरत्र भागातील बेरोजगार तरुण तरुणींना गंडा घालणाऱ्याच्या कारनाम्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यावेळी पनवेलमधील एका जागृत पत्रकाराने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत पनवेल शहर पोलिसांनी ठाणे येथील चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीच्या मुसक्या आवळल्या असल्याने पोलिसांच्या या कर्तबगारीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीला ठेवण्यात आले असून अशा प्रकारे फसवणूक झालेल्या तरुणांनी पनवेल शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, यातील संशयित आरोपी हा रोजगार मेळाव्याच्या फेसबुक पेज वरून  तसेच  सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना त्यांच्या बेरोजगारीचा गैरफायदा घेऊन त्यांचे दूरध्वनी क्रमांक मिळवून चाणाक्ष रीतीने गंडा घालण्याचा उपक्रम त्याने सुरु केला. यावेळी पनवेलमधील ए एम न्यूज चॅनलचे प्रतिनिधी साहिल रेळेकर यांच्या जवळच्या एका नातेवाईकाला या ठगाने संपर्क साधून एलएनटी कंपनीमध्ये आपल्यासाठी नोकरी उपलब्ध झाली आहे, याठिकाणी आपले सिलेक्शन झाले आहे, तसेच आपले अपॉइंटमेंट लेटर आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला तात्काळ याबाबत हजर व्हावे लागेल. मात्र यासाठी आपल्याला कंपनीचा ड्रेस तयार करण्याचा असून आपण ड्रेस साठी 5 हजार 800 रुपये आमच्या खात्यामध्ये भरल्यानंतर आपण हजर होताच चौथ्या दिवशीच आपले पैसे परत रोख स्वरूपात दिले जातील. मात्र या ठगाने असा बनाव करून अनेकांना फसविले असण्याची शक्यताही यावेळी वर्तविण्यात आली आहे. यावेळी पत्रकार साहिल रेळेकर यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर सदर बाब ही चुकीची असल्याची पाल त्यांच्या मनात चुकचुकली. यावेळी त्यांनी सदर प्रकाराबाबत दूरध्वनीवरून आरोपीशी बोलण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपीची मवाळ भाषा त्यांना ऐकावयास मिळाली. यावेळी त्यांनी तुम्हाला काय करायचे ते करा, असे बेताल वक्तव्य केल्यामुळे अखेर पत्रकार साहिल रेळेकर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत रीतसर तक्रार दाखल केली. गेला महिनाभर त्याच्याकडून आपल्या नाईवाईकांचे पैसे परत मिळावे ही भावना असल्यामुळे त्यांनी पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र साहिल रेळेकर यांनी आपला संयम संपल्यानंतर पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत दिनांक 8 जानेवारी रोजी रात्री 11 वाजण्याच्या रीतसर तक्रार दाखल केली, त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल तारमळे, पोहवा राऊत, पोहवा आयरे, पोना वाघमारे, पोना मोरे, पोशि गर्दनमारे, पोशी घुले यांनी आरोपी मनोज चौगुले याच्या दूरध्वनी क्रमांक 7977790366 या नंबरवरून तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासातच आरोपीला शिताफीने अटक केली. यावेळी त्याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला शुक्रवारी न्यायालयात नेण्यात आले. 

पनवेल शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन पनवेल शहर पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीने अशा प्रकारे अनेक तरुण – तरुणींना गंडा घातला असल्याचे तपासात समोर येत आहे, त्यामुळे अशा पद्धतीने जर कोणी आपल्याशी संपर्क साधून पैसे मागत असेल अथवा मागितले असतील तर सुजाण नागरिक बनून जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी केले आहे.