पनवेल महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, उपमहापौरपदी जगदिश गायकवाड, तर पोटनिवडणुकीत रुचिता लोंढे यांचा दणदणीत विजय

4883
23841

पनवेल :

पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर पद निवडणुकीत जगदिश गायकवाड व नगरसेवकपदाच्या पोटनिवडणुकीत रुचिता लोंढे या भाजप, आरपीआय, मित्रपक्षाच्या उमेदवारांनी भरघोस मताधिक्य मिळवून दणदणीत व अपेक्षित विजय मिळवित पनवेलमध्ये महाविकासाआघाडीचा दारुण पराभव केला. पनवेल महापालिकेची स्थापना १ ऑक्टोबर २०१६ रोजी झाली. पनवेलच्या पहिल्याच निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ७८ नगरसेवकांपैकी ५१ नगरसेवक जिंकून पनवेल महापालिकेवर विजयाचा झेंडा रोवला. अडीच वर्षानंतर पुन्हा महापौर पदासाठी निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीत भाजप मित्रपक्षांच्या उमेदवार डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौर पदासाठी जगदिश गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच शेकापनेही या पदांसाठी आपला उमेदवार दिला. पक्षीय बलाबल पाहता भाजप उमेदवारांचे पारडे अधिक जड होते, त्यामुळे फक्त निकालाची औपचारिकता शिल्लक होती. ती आज ४९ विरुद्ध २७ असा निकाल जाहीर होऊन पूर्ण झाली. त्यानुसार पुन्हा एकदा महापौरपदी डॉ. कविता चौतमोल तर उपमहापौर म्हणून जगदिश गायकवाड दणदणीत मतांनी विजयी झाले.
नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी प्रभाग १९ ब च्या पोटनिवडणुकीत मुग्धाताईंच्या कन्या रुचिता यांना संधी देण्यात आली. लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुचिता लोंढे यांचा घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला. विरोधकांनी प्रचाराच्या अनेक क्लुप्त्या केल्या मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर त्या फोल ठरल्या. या निवडणुकीत रुचिता गुरुनाथ लोंढे यांना ६२३१ तर महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वप्नल लक्ष्मण कुरघोडे यांना अवघी २३८७ मते पडली. रुचिता यांनी तब्बल ३८४४ मतांची आघाडी घेऊन शिवसेनेच्या स्वप्नल कुरघोडे यांचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे महाविकासाआघाडीच्या नथीतून वार करण्याचा प्रयत्न करणारी शिवसेना पनवेल महानगरपालिकेत शून्यावरच राहिली आहे. यावेळी सर्व विजयी लोकप्रतिनिधींचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी घोषणा, ढोलताशा व फटाक्यांच्यागजरात जल्लोष साजरा करण्यात आला. त्यामुळे पनवेलमध्ये सर्वत्र जल्लोषमय वातावरण पहायला मिळाला.
लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी चांगल्याप्रकारे मेहनत घेतली. त्यामुळे अपेक्षित विजय सहज झाला. रुचिता लोंढे लोकप्रतिनिधी म्हणून मुग्धाताईंच्या स्वप्नांना पूर्ण करेल. सर्व मतदार व कार्यकर्त्यांचे आभार व अभिनंदन. – आमदार प्रशांत ठाकूर

एकच वादा प्रशांतदादाने गुंजले पनवेल अनेक विकासकामांच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलचा चेहरा विकासात बदलला आहे. त्यामुळे त्यांच्या विकासकामांचा गौरव राज्यभर आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा आलेख उंचावतच आहे. त्यांच्या कार्याचा ठसा आणि तळागाळात असलेला संपर्क म्हणजेच माणुसकीचे नाते सर्वपरिचित आहे. विजयात त्यांचे असलेले योगदान कायम राहिले आहे, त्यामुळे विजयी जल्लोष करतानाच एकच वादा प्रशांतदादा नावाचा गजर पनवेलमध्ये होत होता.


4883 COMMENTS