पनवेल :

वन्यप्राणी खवल्या जातीचा मांजर जवळ बाळगल्याने धनदौलत व ऐश्‍वर्य मिळते अशा गैरसमजेपोटी त्या प्राण्याची तस्करी व विक्री करण्याच्या उद्देशाने पनवेल परिसरात आलेल्या 7 जणांना सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलीस ठाण्याचे वपोनि सतीश गायकवाड व त्यांच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन गाड्यांसह बेशुद्ध अवस्थेत असलेला खवल्या मांजर हस्तगत करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी अशाच प्रकारे खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खवल्या मांजरासह एका इसमाला अटक करण्यात आली होती.
कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनेश बच्छाव यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एका अ‍ॅम्ब्युलन्स व क्वीड गाडीमधून पनवेल-मुंब्रा रोडने कळंबोली वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोरील बस स्टॉपजवळ काही अज्ञात इसम वन्य प्राण्याची तस्करी व विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार वपोनि सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनेश बच्छाव, पो.हवा.ब्रह्मदेव जाधव, म.पो.हवा.अलका पाटील, पो.हवा.सुनील कानगुडे, संजय भोरे, कृष्णात माळी, पो.ना.सचिन शेवाळे, किशोर टेकाळे, सावनकुमार इंगळे, पो.शि.संजय गीते आदींच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून त्या दोन गाड्या अडवून गाडीमध्ये असलेले रमेश गणपत दाते (38 मु.पो.आनेगाव), सुनील नामदेव दाते (मु.पो.आनेगाव), मुकेश शंकर मोहिते (36 मु.पो.वागजाई नगर), उमेश बबन पवार (32 मु.पो.भरणा नाका), पांडुरंग सदाशिव चव्हाण (मु.पो.महाबळे), विजय रामचंद्र मोरे (35 रा.मु.पो.वेरळ), भगवान कोंडीबा माने (22 मु.पो.आरव) यांना ताब्यात घेवून अ‍ॅम्ब्युलन्स पाठीमागील दोन्ही शिटच्या मध्यभागी एका गोणपटात असलेली स्टीलची टाकी, त्यावर एक ब्लँकेट व टाकीत एक साधारण तपकीरी रंगाचा खवल्या मांजर त्याचे वजन 7 किलो 790 ग्रॅम बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने या 7 ही जणांना ताब्यात घेवून त्यांच्या विरोधात वन्यप्राणी अधिनियम 1972 चे कलम 51, 52 अन्वये गुन्हा दाखल करून सदर आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर मांजर कोणाला देण्यासाठी घेवून आले होते याचा शोध कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मनेश बच्छाव करीत आहेत.