महाड : रायगड सह कोकणात काँग्रेस पक्षाला ताकद देण्यासाठी माजी आमदार माणिक जगताप यांना विधान परिषदेचे सदस्यत्व किंवा महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात यावे असा ठराव आज रायगड जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. रायगड जिल्हा काँग्रेसची बैठक आज महाड येथे घेण्यात आली. माणिक जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा,तालुका काँग्रेस चे अध्यक्ष राजुशेठ कोरपे,गणेश सेवक व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांनी हा ठराव मांडला. सर्व तालुका काँग्रेस अध्यक्षांनी या ठरावाला एकमुखी अनुमोदन देत हा ठराव मंजूर केला. हा ठराव आता प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येणार आहे. दरम्यान, या बैठकीत बोलताना, काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नाही,तर ती एक विचारधारा असल्याने हा पक्ष कधीही संपणार नाही असा विश्वास व्यक्त केला. रायगड जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नसला तरी प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर जिल्ह्यात कॉग्रेसची ताकद वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा काँग्रेसमध्ये ताज्या दमाचे पदाधिकारी नेमून दर महिन्याला एका एका तालुक्यात जिल्हा काँग्रेसची बैठक घेण्यात येणार असल्याचेही श्री. जगताप यांनी यावेळेस सांगितले. या बैठकीपूर्वी श्री. जगताप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पाचाड येथे जावून राजमाता जिजाऊ मांसाहेबांना जयंती दिनानिमित्त अभिवादन केले.