उतेखोल/ माणगांव : माणगांव व्यापारी असोसिएशन च्या माध्यमातून सुरु झालेल्या माणगांव बसस्थानका समोरील वाहतुक नियंत्रण चौकीच्या मागील भिंतीवर साकारलेल्या “माणुसकीची भिंत” या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना नेते ॲड.राजीव साबळे, सुप्रसिध्द डाॅक्टर मदन निकम, माजी झेडपी सदस्य ज्ञानदेव पवार , उद्योजक संजयअण्णा साबळे, व्यापारी अध्यक्ष गिरीश वडके, कार्याध्यक्ष रामणारायन मिश्रा, विक्रांत गांधी, दिनेश मेहता, मराठा समाजाचे उपाध्यक्ष नरेंद्र जाधव, बशीर करेल, रमेश जैन, मांगीलाल शेट, हरिष शेट, प्रशाद धारिया, सुरेश जैन, कृष्णाभाई, राजन मेहता, सिद्धांत देसाई, शंकर भाई, नंदूभाई, अशोक जैन, सौ.ज्योती बुटाला, सचिन देसाई, व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण दळवी तसेच अनेक माणगांवकरांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. माणगांव व परिसरातील गरजू लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न या भिंती च्या माध्यमातून करण्यात येणार आहे. व्यापारी असोसिएशन चा १ जानेवारी हा स्थापना दिवस आहे. या दिवसाच्या औचित्याने यंदाच्या वर्षी संघटनेच्या सदस्यांनी थंडी मध्ये बेघर, निराधार असलेल्या व्यक्तींना शोधून त्या जिथे कुठे आहेत उदा. शहरातील एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, निजामपूर रोड, पुलापालिकडे, जूने माणगांव इथे जाऊन त्यांना ब्लँकेट, चादरी, कपडे व चपला यांचे वाटप केले. गरजवंताला रात्री थंडीत अनपेक्षित पणे मिळालेली भेट पाहुन आनंद झाला, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. त्यावेळी संघटनेच्या हे लक्षात आले की हे काम आपण कायम करणे गरजेचे आहे. त्यातून “माणुसकीची भिंत” जन्माला आली आहे. असे व्यापारी संघटनेचे माजी अध्यक्ष बाळा दळवी यांनी सांगितले आहे. आजही अनेक गरजवंतांना कपडे, चपला वाटप करण्यात आले आहे. उद्दीष्ट असे आहे की शक्यतो स्वाभिमानाने समाजाने जगावे, स्वकष्टाने आपल्या गरजा स्वतः पूर्ण कराव्यात पण तरीही ते करत असलेल्या प्रयत्नांत काही उणिवा राहतात. असे स्वाभिमानी, कष्टकरी कोणी आढळल्यास त्या व्यक्तींला मदत या माध्यमातून दिली जाईल. मग ती कोणत्याही स्वरूपात असेल पाटी पेन्सिल, दप्तर अन्य काहीही सुस्थितीतील उपयोगी वस्तु तसेच ज्यांना कोणाला आपल्या कुटुंबातील घरातील जुन्या, न वापरात येणाऱ्या कपडे, अंथरुन, पांघरुन ईत्यादी नित्योपयोगी वस्तु दान द्यायची ईच्छा असेल तर तसे त्यांनी व्यापारी संघटनेस कळविल्यास, आपला त्या विभागातील कार्यकर्ता जाऊन त्या वस्तूची स्थिती पाहिलं व देण्या योग्य असेल व उपयोगी असेल तरच तिचा स्वीकार करेल व ती गोरगरीब, गरजवंताला देण्यात येईल. या कामी खूप लोकांची स्वयंसेवकांची गरज लागणार आहे. लहान मोठी, स्त्री पुरुष वयस्कर मंडळी कोणीही यात काम करू शकतो. आपला व्यवसाय सांभाळून एक सामाजिक ईश्वरीय काम म्हणून. माणसां मधिल माणुसकीचे दर्शन घडविणारी ही भिंत आज खऱ्या अर्थाने गरजवंतांना आधार देण्यासाठी भक्कमपणे उभी राहीली असुन या नाविण्यपूर्ण उपक्रमा बद्दल समस्त माणगावकरांकडुन व्यापारी असोसिएशनवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर शुभेच्छा संदेशांद्वारे उपक्रमाबद्दल जोरदार सकारात्मक प्रतिसाद दिसुन येत आहे.