दरवर्षी पावसाळ्यात चार महिने अतिवृष्टीमुळे नेरळ माथेरान ही मिनिट्रेनची सेवा पूर्वीपासून बंद करण्यात येत असते. घाटरस्त्यात दगडगोटे पडून अपघात होण्याची दाट शक्यता असते याच कारणास्तव मिनिट्रेन चार महिने विश्रांती घेत असते. याकामी महत्वाच्या ठिकाणी जिथे खरोखरच आवश्यकता आहे अशा ठिकाणी रेल्वेच्या एका बाजूला असणाऱ्या डोंगराला संरक्षण जाळ्या बसविल्या तर पावसाळ्यात सुध्दा ही सेवा उपलब्ध होऊ शकते परंतु त्यासाठी रेल्वेच्या वरिष्ठांची आणि अधिकाऱ्यांची मुख्यतः मानसिकता असायला हवी. केवळ याच मिनिट्रेनच्या सफरीसाठी देशविदेशातील पर्यटक नियमितपणे माथेरानला भेट देत असतात. मुंबई पुण्यापासून जवळ असल्याने इथे बाराही महिने पर्यटकांची रेलचेल सुरूच असते. अन्य ठिकाणी लोणावळा ,पुणे  रेल्वेच्या घाट मार्गावर धोकादायक ठिकाणी डोंगर भागात संरक्षण जाळ्या रेल्वे प्रशासनाने लावल्या आहेत त्याच धर्तीवर नेरळ ते माथेरान या घाट मार्गावर सुध्दा ही कामे युद्धपातळीवर केल्यास बाराही महिने रेल्वे प्रवासाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रीघ लागेल.