राज्यात वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहन
चालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची
काळजी घ्यावी. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान एक आठवडा न पाळता वर्षभर
वाहतुकीच्या नियमांसाठी दक्ष राहून शून्य टक्के अपघाताकडे लक्ष देऊन सुरक्षित महाराष्ट्र घडवू या, असे मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी आज येथे सांगितले. जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे परिवहन विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य व मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 वा राज्य रस्ता सुरक्षा
सप्ताह 2020 चे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिवहन मंत्री ॲड.अनिल
परब, परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधानसभा सदस्य राहुल नार्वेकर उपस्थित
होते. मुख्यमंत्री म्हणाले, पोलीस यंत्रणा नेहमीच आपल्या युनिफॉर्ममध्ये कर्तव्य बजावत असतात. म्हणून सामान्य
जनता विविध उत्सव-सणांचा आनंद घेऊ शकते. या आनंदाचे खरे मानकरी ही पोलीस यंत्रणाच आहे. वाहतुकीचे नियम
शाळा, महाविद्यालय स्तरावर मुलांना शिकवणे आवश्यक आहे. मुलांना नियम समजल्यानंतर ते आपल्या कुटुंबियांना
समजावून सांगतात. त्यासाठी मुलांना सुरक्षिततेचे नियम सांगणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे रस्त्यावर
वाहतूक पोलीस जरी दिसत नसले तरी पोलीसांचे लक्ष आपल्यावर असते. वाहन चालविताना नियमाचे पालन करावे.
रस्ता सुरक्षा समितीकडून रस्ते अपघातात मृत्यूमूखी पडणाऱ्यांचे प्रमाण 10 टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट
देण्यात आले होते. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्याने रस्ते अपघात कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या
माध्यमातून विविध उपाययोजना राबवून जिल्ह्यामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण कमी झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here