गोरेगांव : गोरेगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक २००२ पासून जवळजवळ एक तप छ. शिवरायांच्या प्रतिक्षेत आहे. अठरा वर्षे उलटूनही छत्रपती शिवरायांचा अर्धपुतळा चौकात बसविण्यास अपयश आल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीचे स्वर उमटत आहे.
सार्वजनिक ठिकाणी पुतळे बसविणे, रस्ते, पुल, चौकांचे नामकरण करणे यासाठी सुरु असलेला सर्वपक्षिय कार्यकर्त्यांचा अट्टाहास पाहिला की करेंगे या मरेंगे या अविर्भावात ही मंडळी आपली अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी असा अट्टाहास करतात आणि त्यातून हिरो बनण्याचा प्रयत्न करतात का? असा प्रश्न उपस्थित होतो किंवा वास्तूचे नामकरण करणे इथपर्यंतचे कार्य संपल्यानंतर केवळ पुण्यतिथी किंवा जयंतीलाच या पुतळ्यांची वा पाट्यांची स्वच्छता करुन हार घातले जातात, घोषणांचा गजर केला जातो पुन्हा वर्षभर या पुढारी मडळींना वेळच मिळत नाही. शिवजयंती उत्सव मंडळाने सन २००२ मध्ये आग्रही भुमिका घेत छ. शिवाजी महाराज चौकात बांधकाम करीत चौथरा तयार केला. परंतु, सुमारे सतरा अठरा वर्षाचा कालावधी उलटून गेल्यावरही या चौकामध्ये शिवप्रतिमा बसविण्यास गोरेगांवातील नेते मंडळीना यश आले नाही. गोरेगांव हा शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असल्याचा सेनेचा कायम दावा असतो. मागील तीनही वेळा शिवसेनेचाच आमदार या विभागातून निवडून आला परंतु शिवप्रतिमा बसविण्यासाठी शासकीय परवानगी घेण्याचे प्रयत्न अथवा पाठपुरावा असल्याचे ऐकीवात नाही. दरवर्षी शिवजयंतीला या चौथऱ्यावर शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा ठेवून त्यांचे पुजन केले जाते. ही शिवप्रतिमा मिरवणुक झाली की पुन्हा कपाटामध्ये बंदिस्त होते. मग परत पुढच्या वर्षी मागच्या वर्षीचे गाऱ्हाणे सुरु होते. गोरेगांवचे तारणहार विकासपुरुष भाऊ, दादा, भाई, शेठ, अशी सर्वांना मोठमोठी बिरुदावली मिरवणारे मात्र कोणीही पुढाकार घेत नसल्याने छ. शिवाजी महाराज चौक हा शिवरायांविना कायम ओकाबोकाच दिसतो.चौथऱ्याचा वापर केवळ चौक सभा, निषेध मोर्चे यासाठीच होत असल्याने शिवप्रेमींनी मध्ये नाराजी दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here