तळोजा औद्योगिक वसाहतीतील फोरस्टार फ्रोजन फुड्स या कंपनीमध्ये शनिवारी सायंकाळी अमोनियाचा तीव्र वास आल्यामुळे देवीचा पाडा व ढोंगऱ्याचा पाडा येथील ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आरडाओरडा करत गर्दी केली होती. तळोजा औद्योगिक वसाहतीतीत अमोनिया गळती झाल्याच्या अनेक घटना झालेल्या आहेत, त्यामुळे आम्ही नेहमी दहशतीखाली वावरत असतो, अशाप्रकारच्या भावना तेथे जमलेले ग्रामस्थ व्यक्त करीत होते. घटनास्थळी ताबडतोब तळोजा अग्निशमन विभागाचे जवान पोहोचल्यावर त्याठिकाणची पाहणी केली असता त्यांना देखील याचा वास येत असल्याचे जाणवले. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणतीही गळती असल्याचे त्यांना निदर्शनास आले नाही. त्या ठिकाणी काही वेळापूर्वी गळती झाली असावी व कंपनीतील कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी ताबडतोब नियंत्रण मिळवले असावे असा अंदाज तळोजा फायर स्टेशनचे अधिकारी दीपक दोरूगडे यांनी व्यक्त करत आपल्याला कोणतेही रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले नसल्याची, माहिती त्यांनी दिली. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच आमचे दोन अधिकारी देखील त्या ठिकाणी गेले होते. परंतु तेथे कोणतीही दुखापत किंवा गंभीर घटना झाल्याचे त्यांना निदर्शनात आले नाही, अशी माहिती रायगड औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक एम.आर. पाटील यांनी दिली. याबाबत कंपनी व्यवस्थापनाला विचारले असता, कंपनीमध्ये मेंटेनन्सचे काम सुरू होते. अशावेळी अमोनिया वायुचा वास येत असतो. यावेळी तो जास्त असल्याचं सांगण्यात येत असले तरी, तेथील आमच्या कुठलाही कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा अमोनिया गळती असल्याचा आरोप चुकीचा आहे, असा दावा कंपनीचे डायरेक्टर दिलीप पारसनीस यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here