नागपूर: हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेवर आज संध्याकाळी पाच वाजता दारोडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या सात दिवसांपासून तिच्यावर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी तिनं अखेरचा श्वास घेतला. पीडितेवर रविवारी चौथी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, औषधोपचारांना तरुणीकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. तरुणीच्या शरीरातील प्राणवायूचे घटते प्रमाण काळजीची बाब झाली होती. रविवारी मध्यरात्रीपासून पीडितेची प्रकृती अत्यंत खालावली. पीडितेचा रक्तदाब हळूहळू कमी होत गेल्यानंतर सकाळी तिला दोनवेळा हृदयविकाराचा झटका आला. त्यात सकाळी तिचा मृत्यू झाला.
उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाल्याचं समजताच तिच्या गावात शांतता पसरली. ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला. आरोपीलाही पेटवा, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. तिचं पार्थिव गावात आणताच, ग्रामस्थांना भावना अनावर झाल्या. तिच्या घरासमोर मोठी गर्दी झाली होती. पीडितेच्या अंत्ययात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय, नातेवाइक आणि ग्रामस्थांना शोक अनावर झाला होता.