पनवेल : पनवेल मध्ये मृतदेह ठेवण्यासाठी शीतपेटिका ही फक्त एम जी एम हॉस्पिटल कळंबोली येथेच उपलब्ध आहे. काही कायदेशीर बाबींसाठी अथवा नातेवाईकांच्या सोयीसाठी कधी कधी मृतदेह काही काळ जतन करून ठेवावा लागतो. व अत्यंत कठीण प्रसंगात अशा गरजेच्या वेळी पनवेल सारख्या महानगरात ही सुविधा अन्य कुठेही उपलब्ध नाही. याच कारणास्तव मध्यंतरी पनवेल मधील एका व्यावसायिकाचा मृतदेह रात्रभर ए.सी. चालू ठेऊन गाडीत ठेऊन द्यावा लागला. या बाबत पनवेल मधील टिळक रोड ( सदाशिव पेठ) मित्रमंडळ यांनी एक स्तुत्य पाऊल उचलले.
पनवेल मध्ये सध्या प्रशस्त असे उपजिल्हा रुग्णालय सुरु झाले आहे. या हॉस्पिटलच्या उभारणीत सिंहाचा वाटा असणारे शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण यांनी हॉस्पिटल सुरु झाल्यावरही हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरु होण्यासाठी कार्य सुरु ठेवले. हॉस्पिटल मधील ऑपरेशन थिएटर सुरु होण्यासाठी तब्बल पाच लाखाची ऍनेस्थेशिया व अँटी रेबीज औषधे एका खाजगी कंपनीच्या सीएसआर फंडामधून मिळवून दिले. त्याच वेळी येथे मृतदेह ठेवण्यासाठी शीतपेटिका असणे आवश्यक असल्याचे लक्षात येताच सरकारी पैशावर अवलंबून न राहता आपल्या टिळक रोड मित्रमंडळाच्या सहकार्‍यांना हा विषय सांगितला. सर्व सदस्यांनी एकमताने हे काम पूर्ण करण्याचे निश्‍चित करताच आवश्यक तो पत्रव्यवहार करून शासनाची परवानगी मिळवली. सर्व मित्र सदस्यांनी वर्गणी गोळा करून 2 लाख रुपये जमवले आणि ’कुल टच’ या कंपनीला 28 जानेवारीला वर्क ऑर्डर देऊन हॉस्पिटलच्या आवारात ४ मृतदेह ठेवण्यासाठी शीतपेटिका बसवून काम पूर्ण करून घेतले. अवघ्या 14 दिवसात मंडळाने ही मृतदेह ठेवण्यासाठी शीतपेटिका रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द करून त्या सेवेचे लोकार्पण केले. ही सुविधा नागरिकांना पूर्णतः मोफत उपलब्ध असेल. चंद्रशेखर सोमण यांच्यासह मंडळाचे सदस्य श्रीकांत साठे, डॉ. मयुरेश जोशी, संजय जोशी, श्रीकांत पाटणकर, महेश गाडगीळ, अनिल कुळकर्णी, श्रीधर साठे, मिलिंद गांगल, श्रीपाद खेर, विश्‍वेश नातू, अविनाश सहस्त्रबुद्धे या सर्वांच्या सक्रीय सहकार्याने हे काम पूर्ण झाले. या वेळी पनवेल चे वैद्यकीय अधीक्षक नागनाथ येमपले, महावितरणचे जयदीप नानोटे, किरण चौधरी, अ‍ॅड.प्रथमेश सोमण, शिवसेना शहरप्रमुख अच्युत मनोरे, संघटक प्रवीण जाधव, विभागप्रमुख विश्‍वास पेटकर, अरुण ठाकूर, महाड बँकेचे व्यवस्थापक विचारे, अभिनय सोमण, मंदार काणे, हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स, अधिकारी, हितचिंतक नागरिक उपस्थित होते. टिळक रोड मित्रमंडळातर्फे पनवेल मध्ये गेली 14 वर्ष ऍम्ब्युलन्स व शववाहिका सेवा अत्यंत्य शिस्तीत, विश्‍वासू आणि सातत्यपूर्ण पद्धतीने चालू आहे. मंडळाने लोकवर्गणीतून आणखी एक सुसज्ज रुग्णवाहिकेचा संकल्प सोडला आहे. त्यालाही परिसरातील नागरिकांकडून भरभरून मदत मिळत आहे.