कर्जत :

कर्जत पासून अवघ्या पाच सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या पळसदरी गावातील रेल्वेच्या अखत्यारीतील तलावात मंगळवारी भली मोठी मृत मगर आढळून आल्याने  या परिसरातील ग्रामस्थ मंडळ चांगलेच भयभीत झाले आहेत. रात्री साडेबाराला वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नाने तलावात आत 50 मीटर अंतरावर तरंगत असलेल्या मृत मगरीला बाहेर काढले. अजूनही काही मगरी तलावात असल्याचा अंदाज यावेळी वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून तलावात उतरण्यास ग्रामस्थांना बंदी केली आहे. कर्जत – खोपोली रेल्वे मार्गावरील पाहीलेच रेल्वे स्थानक म्हणजे पळसदरी गाव येथे ब्रिटिशांनी वाफेवर चालणाऱ्या रेल्वे इंजिनच्या पाण्यासाठी फार मोठा तलाव( डॅम ) बांधला. मात्र कालांतराने वाफेवरची इंजिन बंद झाल्याने रेल्वेने तलावाच्या पाण्याचा वापर बंद केला. त्यामुळे साहजिकच तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याचा मृत साठा पडून आहे. अनेक वर्षे योग्य देखभाल न ठेवल्याने तलावात प्रचंड प्रमाणात गाळ साचून जलपर्णीनी विळखा घातला आहे. आजूबाजूला डोंगर, निसर्गरम्य वातावरण काही अंतरावर श्री स्वामी समर्थांचा मठ असल्याने पावसाळ्यात या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक वर्षासहलींचा आनंद घेण्यासाठी येतात . आणि त्यातील काही तलावात पोहण्यासाठी उतरतात  मात्र डॅम पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तसेच साचलेल्या गाळाच्या दलदलीत , जलपर्णीत अडकून आजतायगायत मागील वर्षात दहा पेक्षा अधिक जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे असे असूनही रेल्वे प्रशासन या तलावाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.मात्र या तलावात मागील वर्षापर्यंत मगर नव्हती हे नक्की. तशी माहिती स्थानिक ग्रामस्थ अँड .प्रदीप सुर्वे आणि वनाधिकारी निलेश भुजबळ यांनी दिली. त्यामुळे अचानक या तलावात मृत मगर आढळल्याने गावकऱ्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच मात्र तेवढीच भीती वाटू लागली आहे. कारण गावातील महिला धुणीभांडी करण्यासाठी या तलावावर येतात. तसेच गायी गुरे घेऊन शेतकरी येतात. त्यामुळे आता या मगरीच्या अस्तित्वामुळे तलावात जर अजून मगरी असतील तर त्या आपल्यावर हल्ला करतील या विचाराने गावकरी चांगलेच धास्तावले आहेत .