मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरूड क्षेत्र हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, येथील नागरिकांचा उदरनिर्वाह हा पर्यटनाशी संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. या क्षेत्रातील मुरूड वासियांच्या जमिनी चुकीच्या नोंदीने खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ठ केल्या असून, त्यांच्या जमिनीवरील अशा नोंदी तातडीने रद्द करण्यात याव्यात, असे निर्देश पर्यटन राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आज मंत्रालयात मुरूड व रायगड जिल्ह्यातील खारभूमी परिसरातल्या जमिनीवरील चुकीच्या नोंदी, श्रीवर्धन तालुक्यातील जमिनी वापरास बंदी, कासु गडब विभागातील खारभूमी योजनेअंतर्गत बंदिस्ती दुरूस्ती, खार बंदिस्ती होण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आदी उपस्थित होते.
मंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या, मुरूड शहर हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित असताना, जमिनीच्या ७/१२ उता-यावरील इतर हक्काच्या अधिकारामध्ये खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ठ अशी नोंद करण्यात आली आहे. या नोंदी रद्द केल्यास येथील नागरिकांना पर्यटन व्यवसाय वृद्धी करणे सोपे जाईल. ज्या जमिनी खारभूमी क्षेत्रातील आहेत त्या वगळून इतर जमिनीवरील या चुकीच्या नोंदी त्वरीत रद्द करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. याचबरोबर श्रीवर्धन तालुक्यातील ज्या शेतक-यांच्या जमिनी वनेतर वापरास बंदी आहे. अशा शेतक-यांच्या जमिनीची माहिती घेऊन त्यांना त्या जमिनी मिळकती विक्रीस शासनाची परवानगी देण्यासंदर्भात कार्यवाही करावी असेही राज्यमंत्री कुमारी तटकरे म्हणाल्या. मुरूड-जंजिरा येथील अनेक वर्षापासून गाईड म्हणून कार्यरत असलेल्या स्थानिकांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना मान्यता देण्यात यावी. तेथील जल-वाहतूकीस परवानगी मिळण्यासंदर्भात कार्यवाही करावी. जुन्नरला विशेष पर्यटनाचा दर्जा देण्यात आला आहे याच धर्तीवर श्रीवर्धन व मुरूड तालुक्यासह जिल्ह्यातील विशेष पर्यटनाचा दर्जा देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करून पुढील कार्यवाहीस गती द्यावी. जंजीरा पद्मदुर्ग तसेच दिवेआगार येथे जेट्टी उभारावी, कासु गडब विभागातील खारभूमी योजनेअंतर्गत बंदीस्तीची दुरूस्ती करण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशाही सुचना राज्यमंत्री कुमारी तटकरे यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.
या बैठकीत पर्यटन विभागाच्या उपसचिव उज्वला दांडेकर, सहायक संचालक रवींद्र पवार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता सं. निरमनवार, उत्तर कोकण पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्र.बा.मिसाळ, खारभूमी विभाग, पर्यटन विभाग, एमटीडीसी अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here