उरण : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथी निमित्त उरण तालुक्यातील कलंबूसरे येथील आदर्श ग्रामोद्धार मंडळ निर्मित स्वातंत्राची सिंहगर्जना या ऐतिहासिक नाट्य कलाकृतीचा प्रयोग उमरठ ता – पोलादपूर येथे सादर होणार आहे. पर्यायाने तान्हाजीच्या मातृभूमीत स्वराज्याच्या सिह गर्जनेचे स्वर दुमदुमणार आहेत. स्वराज्याचे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या 350 पुण्यतिथी सप्ताहानिमित्त 17 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांची मातृभूमी उमरठ येथे स्वातंत्र्याची सिह गर्जना या ऐतिहासिक कलाकृतीचा प्रयोग संपन्न होत आहे. उरण तालुक्यातील कलंबूसरे गावातील आदर्श ग्रामोद्धार मंडळाची ही नाट्य निर्मिती असून जनार्दन तोडणकर लिखित स्वातंत्र्याची सिंह गर्जना चे दिग्दर्शन वसंत चिर्लेकर यांनी केले आहे. या नाट्य कलाकृतीत शिवाजी महाराजांच्या भूमिकेत महेश भोईर ,तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत संतोष पाटील , कान्होजी जेधेंच्या भूमिकेत सदानंद भेंडे, येसाजी कंक च्या भूमिकेत अशोक पाटील, साबाजी च्या भूमिकेत सिताराम भेंडे, जोत्याजीच्या भूमिकेत रविंद्र साटम, ज्योत्याजी ची मुलगी गिरजेच्या भूमकेत नविमुंबई येथील अलका परब, केसरसिह च्या भूमिकेत वसंत भोईर, इस्माईलखान च्या भूमिकेत बळवंत गायकवाड, अब्दुल्ला अनंत म्हात्रे, मावळे संजय म्हात्रे, गुरुनाथ तांडेल, जगन्नाथ पाटील, सुहास म्हात्रे, अरब ऋषिकेश भेंडे, नरेश पाटील, जयवंत म्हात्रे हे कलाकार रंग मंचावर आपली कला सादर करणार आहेत. सदर नाट्य कलाकृतीची तयारी पूर्ण झाली असून कलाकार हे नाटक जास्तीत जास्त यशस्वी करण्यासाठी जोरदार तयारीला गुंतले आहेत.
उमरठ च्या भूमीत स्वातंत्र्याची सिंह गर्जना दुमदुमणार असल्याने पोलादपूर वासीयांचे लक्ष याकडे लागले आहे. ही नाट्यकृती पाहण्यासाठी अनेक जेष्ठ मान्यवर उपस्थित राहणार आहेत.