थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू प्रा. डॉ. एन. डी. पाटील जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रदान

पनवेल : एन. डी. पाटील साहेबांचे जीवन म्हणजे अखंड संघर्ष असून हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे चळवळीचे शास्त्र आणि शस्त्र स्वतःच्या कृतीतून विकसित करणारे विधायक संघर्षाचे लोकनायक एन. डी. पाटील सर यांना जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव प्रदान करताना अतिशय आनंद होत असून संघर्षाच्या लोकनायकाचा गौरव स्फूर्ती देणारा आहे, असे मत राज्याचे उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज (शनिवार, दि२९) खांदा कॉलनी येथे व्यक्त केले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान व गोरगरीब कष्टकऱ्यांचे दृष्ट नेते थोर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व. जनार्दन भगत स्मृती जीवन गौरव पुरस्कार सोहळा खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) मोठ्या दिमाखात आणि समारंभपूर्वक पार पडला . या सोहळ्यात स्व. जनार्दन भगत यांच्या स्मृती प्रित्यर्थ पहिल्या पुरस्काराने रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन, थोर विचारवंत आणि चळवळींचे महामेरू असलेले प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रक्कम पाच लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते. या सोहळ्यास नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, पालक, हितचिंतक असे जवळपास पाच हजार जणांची उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, सोहळ्याचे संयोजक व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, विशेष अतिथी म्हणून उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, माजी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार, रायगडचे माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार महेश बालदी, एन. डी. पाटील यांच्या सुविद्य पत्नी सरोजिनी पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगिरथ शिंदे, इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, उपमहापौर जगदिश गायकवाड, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, रयत संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य संजीव पाटील, मीना जगधने, दशरथ भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, संचालक शकुंतला ठाकूर, परेश ठाकूर, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, संजय भगत, हरिचंद्र पाटील, अनिल भगत, संजय पाटील, अतुल पाटील, नगरसेवक सतीश पाटील, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नामदार दिलीप वळसे पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले कि, जनार्दन भगत साहेबांच्या कार्याचा आणि योगदानाचा मी आढावा घेतला, त्यांचे कार्य समाजासाठी आणि फक्त समाजासाठीच होते आणि महान होते. त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीस म्हंटले कि, या सोहळ्याचे संयोजक लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व निवड समितीने आज भगत साहेबांच्या नावाने जो जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे त्या पुरस्कारासाठी थोर विचारवंत एन. डी. पाटीलसर या समर्थ व्यक्तिमत्वाची निवड केली त्याबद्दल त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. विचारांची निष्ठा जपणारे व्यक्तिमत्व म्हणून एन. डी. पाटील यांचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीचे अग्रणी आणि समाजातील सर्वसामान्यांच्या जीवनाशी एकरूप झालेले पाटील साहेब यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान होत आहे हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. समाजातील सर्वसामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी सीमा भागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी आणि शेतकरी शेतमजूर कामगार आदिवासी पाड्यातील सर्वसामान्य माणसाचे जीवन उंचावण्यासाठी अखंड अविरत कार्य सुरू आहे, त्या एन. डी. पाटील साहेबांना आज माझ्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्याचा माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, असे मी मानतो. क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गावी एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये सरांचा 15 जुलै 1929 जन्म झाला शाहू-फुले-आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याला प्रभावित झालेला हा काळ हा असताना त्या वेळेला शिक्षण घेत असताना प्रचंड वाचन उत्तुंग ध्येयवाद आणि समर्पित जीवन जगण्याची अभिलाषा असलेल्या शिक्षकांचा सहवास त्यांना लाभला हा त्यांच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊन गेला. याच भावनेमध्ये समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आयुष्यामध्ये महत्त्वाचा तो टप्पा ठरला. आज आपण एन. डी. सरांचे व्यक्तिमत्व पाहतो. सरांच्या शिक्षणाचा काळ हा मातृभूमीला पारतंत्र्याच्या साखळदंडातुन मुक्त करायचा चळवळीचा काळ होता. वयाच्या सोळाव्या वर्षी सरांनी आपली नाळ समाजाशी घट्ट पणाने लावून ठेवली. शंकररावजी मोरे संपादक असलेल्या जनसत्ता साप्ताहिकाचे गठ्ठे हातामध्ये घेऊन निघताना त्यांचे मथळे ओरडून सांगणाऱ्या एनडी सरांना तात्कालिक राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचे अतिशय जवळून ओळख झाली वडील आणि भावाच्या निधनानंतर बहुजन समाजाचा पोशिंदा पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एनडी सर आणि कुटुंबाला आधार दिला. कर्मवीरांचा संवाद सरांच्या जीवनावर दीर्घकाळ परिणाम करून गेला. महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील शेतकरी, कामगार कष्टकरी यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरांनी संपूर्ण आयुष्य वाहून घेतले आहे सुमारे १८ वर्षे विधानपरिषदेत आणि पाच वर्षे विधानसभेमध्ये अशी महत्त्वाची २३ वर्ष राजकीय क्षेत्रात राहून सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी सरांनी घालवले. याच काळात महाराष्ट्रातील कामगार चळवळीला उर्जितावस्था देण्याचे काम यांच्या नेतृत्वाखाली झाला. कर्मवीर अण्णांच्या अखेरच्या काळात त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये सरांना सदस्य करून घ्या असे पत्र लिहून संस्थेला कळवले होते त्यांच्या निर्वाणानंतर आठ दिवसांनी सरांना ही घटना कळाली त्या दिवसापासून आज अखेर अण्णांनी टाकलेली जबाबदारी देशनिष्ठा आणि आत्मीयता आणि जिव्हाळ्याने पार पाडत आहेत त्यामुळे मी जो आज कोणी आहे तो केवळ रयत शिक्षण संस्थेमुळे आणि कर्मवीर भाऊरावांच्या मुळे आहे हे नेहमी कृतज्ञतेने सांगतात. कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्राथमिक शाळा, आश्रम शाळा, आयटीआय, नापासांची शाळा, सर्व विद्यापीठ संगणक शिक्षण केंद्र कर्मवीर भाऊराव पाटील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कमवा आणि शिका योजना, स्पर्धा परीक्षा केंद्र, गुरुकुल प्रकल्प लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, दुर्बल शाखा विकास, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन केंद्र, आदींची स्थापना विद्याप्रबोधिनी मार्फत विविध पुस्तकांची निर्मिती असे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर प्राध्यापक एन. डी. पाटील यांचा गेल्या वर्षी १५ जुलैला ९१ वा जन्मदिवस साजरा झाला, त्यावेळी महाराष्ट्रातल्या तीन विद्यापीठांनी त्यांना डिलीट पदवी बहाल केली आणि ते एकमेव असे व्यक्तिमत्व आहेत. राज्याच्या सामाजिक संघटनेमध्ये त्यांचे महत्त्वाचं योगदान आहे.
सर्व प्रकारच्या शिक्षणाचा मूळ असते म्हणतात सरांनी १९९२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘शेवटी शिक्षण आहे तरी कोणासाठी’ या पुस्तकांमधून सरकारचे आणि समाजाच्या डोळे उघडण्याचे काम केले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करताना त्यांनी मंत्रिपदाचा सर्वसामान्यांच्या विकासासाठी मिळालेली संधी म्हणून वापर केला आणि शेतकऱ्यांनी कामगार आपल्या जिव्हाळ्याच्या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. संपूर्ण कालखंडामध्ये ठरवले असते तर कोणत्याही पदापर्यंत ते पोहोचू शकले असते. मात्र त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फक्त बहुजन दुर्लक्षित माणसासाठी काम केले. तत्त्वाशी थोडीशी फारकत घेऊन राजकारणाला साजेशी बाजू घेतली असती तर कदाचित महाराष्ट्राच्या एक नंबरच्या पदापर्यंत पोहोचू शकले असते पण तत्वांशी तडजोड केली नाही. सरांनी आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. त्यांच्या कारकीर्दीला मी वंदन करतो आणि निरोगी दीर्घायुष्य चिंततो तसेच या सोहळ्याचे संयोजक लोकनेते रामशेठ ठाकूर व सहकाऱ्यांचे आभार मानतो.
राज्याच्या उद्योग, खनिकर्म, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या भाषणात म्हंटले कि, कौटुंबिक अशा या सोहळ्यामध्ये आपण मला येण्याची याठिकाणी संधी दिली आणि खऱ्या अर्थाने सर्वांसाठी एक अभिमानाचा आणि भाग्याचा दिवस आहे. त्याबद्दल मी आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांचे त्याचबरोबर आदरणीय प्रशांत ठाकूर यांचे मनापासून आभार मानते. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित शैक्षणिक क्षेत्र असो सामाजिक असो पत्रकार क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्रात या सर्व क्षेत्रांमध्ये अतिशय उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आणि निस्वार्थ पणाने समाजाची सेवा करणारी सर्व मंडळी व्यासपीठावर उपस्थित असल्यामुळे आज आम्हाला सर्वांना मनापासून आनंद आणि एक मनापासून अभिमान आहे.
डॉ. एन. डी. पाटील यांनी शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केली आणि खऱ्या अर्थाने या प्रश्नांना न्याय मिळाला सुरुवात झाली. चळवळींमध्ये त्यांनी मोठ्या पद्धतीने सहभाग घेतला. डॉक्टर एन. डी. पाटील साहेबांच्या कार्यातून कार्याची ऊर्जा कायम दिसत आहे. जनतेची सेवा करायची असेल तर निश्चितपणे त्यांच्याकडे पाहणे जरुरी आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कार्य याचा अभ्यास करणार ते आत्मसात करणं महत्त्वाचे असते आणि ते यातून शिकायला मिळते. काही दिवसांपूर्वी शरद पवार साहेबांची मी भेट घेतली त्यावेळी साहेबांनी उल्लेख केला की या कार्यक्रमाला आवर्जून यायचं होतं पण काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे असल्यामुळे आपल्याला येता येणार नाही. आपल्या समाजामध्ये सामाजिक प्रश्न म्हणून आपण कशा पद्धतीने बघितलं पाहिजे फक्त सोशल मीडियावर राहून उपयोग नाही तर अशा या थोर व्यक्तींचा अभ्यास समजून घेऊन वाटचाल करणे हे महत्वाचे आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि आपण आज डॉक्टर पाटील साहेबांचा त्याचबरोबर सर्व मान्यवर व्यक्तींचा आशीर्वाद घेऊनच पुढे काम करीत राहणार असेही त्या म्हणाल्या.
यावेळी प्रास्ताविकपर भाषणात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले कि, आज आपण जनार्दन भगत साहेबांची 92 वी जयंती साजरी करण्याकरिता आणि भगत साहेबांच्या जन्मदिनानिमित्त आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर सुद्धा ज्यांनी वैचारिक सामाजिक शैक्षणिक व राजकीय भरीव कामगिरी केलेली आहे अशा आपल्या लाडक्या प्राध्यापक डॉक्टर एन.डी.पाटील साहेबांना भगत साहेबांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्या करीता जमलो आहोत. आज जनार्दन भगत साहेबांची 92 वी जयंती. भगत साहेब आपल्यातून गेल्याला बत्तीस वर्षे झाली. त्यांची पुण्यतिथी प्रत्येक ७ मे रोजी आम्ही साजरी करत असतो, पण जयंतीचा सोहळा मोठ्या प्रमाणात आपण आजच साजरा करीत आहोत. त्यांच्या नावाचा जीवनगौरव पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर एन. डी. पाटील साहेबांना आज आपण प्रदान करीत आहोत, आम्हाला या गोष्टीचा अतिशय आनंद होत आहे. जमलेल्या बऱ्याच लोकांना आणि विशेष करून पाहुण्यांना जनार्दन भगत साहेब कोण? हे माहीत नसेल. पण रायगड जिल्ह्याला विशेष करून पनवेल व उरण तालुक्याच्या दृष्टीने जनार्दन भगत साहेब आमचे ‘कर्मवीर’. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या व आज शतक महोत्सव साजरा करीत असलेल्या रयत शिक्षण संस्थेची रोपटे प्राध्यापक डॉक्टर एन. डी. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दि.बा.पाटील साहेबांच्या मदतीने गव्हाण, जासई, फुंडे, नावडे, वावंजे सारख्या असंख्य ठिकाणी रायगड-कोकण च्या कडे कपारीत शिक्षणाची गंगा आणणारे आमचे ‘देवदूत’! भगत साहेब आणि प्राध्यापक डॉक्टर एन. डी.पाटील साहेब हे दोघेही समवयस्क. दोघां चा हि जन्म 1928 सालचा पण भगत साहेबांचा जन्म 29 फेब्रुवारीला असल्याने त्यांची जयंती चार वर्षांनी येते, आज तो सुवर्ण दिवस आहे.
वयाच्या १४ – १५ वर्षापासून त्यांनी ‘चलेजाव’ चळवळीत भाग घेतला तर २७-२८ वर्षांचे असतानाच बेळगाव कारवार सीमा प्रश्नासाठी तुरुंगवास भोगला. पनवेल उरण तालुक्यातील गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी विशेषत: शेतकऱ्यांसाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात ते कणखरपणे लढले. न्याय हक्क मिळवण्यासाठी सतत संघर्ष करत राहिले. मोर्चे, आंदोलने करीत स्वतःच्या संसाराकडे, मुलाबाळांकडे पाठ फिरवून सामाजिक कामात रमले. १९६०-६२ सालापर्यंत पनवेल उरण तालुक्यात पनवेल उरण दोन शहरे सोडल्यास कुठेही हायस्कूलच्या शिक्षणाची हि सोय नव्हती. भगत साहेबांनी डॉक्टर कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्था या भागा आणली नसती तर आज आम्ही ह्या भागातील मंडळी स्टेजवर दिसलो नसतो.
आमच्या शालेय जीवनात, तरुणपणात अर्थातच 1960 ते 1990 च्या काळातील आमचे “आदर्श व्यक्तिमत्व” म्हणून आणि भगत साहेब व प्राध्यापक डॉक्टर एंन. डी .पाटील साहेबांकडे पाहत होतो.
अनेक आजार भगत साहेबांना सतावत असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून मान. दि बा पाटील साहेब, प्राध्यापक डॉक्टर एन.डी.पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली १९८१ व १९८४ झाली मोठे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी अनेक वेळा तुरुंगवास भोगला. जासई नाक्यावर पोलिसांच्या लाठीमारात स्वतः रक्तबंबाळ झाले. जे.एन.पी.टी. व सिडको प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या साठी सतत संघर्ष करत राहिले. त्यामुळे भगत साहेब त्यांच्या वयाच्या ५९-६० व्या वर्षी ७ मे १९८८ रोजी आपल्याला सोडून गेले. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी व प्रकल्पग्रस्तांसाठी लढलेल्या शौर्यशाली व गौरवशाली लढ्याचे आणि डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे या भागात लावलेल्या रोपट्या मुळेच पनवेल उरण तालुक्यात शैक्षणिक क्रांती झाली. त्या कार्यातून प्रेरणा घेवून आम्ही गेल्या ५ दशकाहून अधिक काळ समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी तन मन धन आर्पण करून भगत साहेबांचा वारसा आणि आपला आदर्श सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. आपला वसा आपले समकालीन सहकारी स्वर्गीय जनादर्न भगत साहेबांनी जोपासला. स्वर्गीय भगत साहेबांनी आपणां बरोबर पनवेल, उरण तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यात आपल्या प्रत्येक सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय चळवळीत हिरीरीने भाग घेवून आपणास निष्ठेने साथ दिली आणि आपल्या परीने सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यात आपला ठसा उमटवला. त्यामुळेच पनवेल उरण तालुक्यात कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेचे आपण आणलेले रोपटे आज बहरलेले दिसते. रयत शिक्षण संस्था हि आमची मातृसंस्था आणि त्यातून ज.आ.भगत शिक्षण संस्था स्थापून आम्ही त्यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आहोत.
आज या संस्थेची ८ विद्यासंकुले अतिशय उच्च दर्जाचे ज्ञानदानाचे काम करीत आहेत. संस्थेची संख्यात्मक व गुणात्मक वाढ झपाट्याने होत आहे. विशेषत: आज नव्या मुंबईत आधुनिक सर्व समावेशक अद्यावत व परिपूर्ण शिक्षण देण्याचे कार्य ज.आ. भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून अविरत सुरू आहे. या संस्थेच्या माध्यमातून कला, विज्ञान, वाणिज्य आणि विधी मधील पदवी तसेच सीबीएसई सारखे पूर्व प्राथमिक ते पदवी पर्यंत दर्जेदार शिक्षण देताना राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित पुरस्कार या ज. आ. भगत शिक्षण प्रसारक संस्थेने मिळविले आहेत. कर्मवीर अण्णांची रयत शिक्षण संस्था, आपला आदर्श आणि स्वर्गीय भगत साहेबांची स्मृती जपण्याच्या दृष्टीने आम्ही स्वर्गीय भगत साहेबांच्या नावाने पहिला “जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्कार 2020” प्रदान करताना माननिय प्राध्यापक डॉक्टर एन. डी. पाटील साहेब आपल्या शिवाय अन्य मानकरी होऊ शकत नाही. ही जाणीव ठेवून आपल्या कार्याप्रती सलाम करण्याकरिता आपणास हा पुरस्कार देत आहोत. आणि महाराष्ट्रातील समाज धुरंधरांना स्वर्गीय भगत साहेबांच्या प्रत्येक जयंतीदिनी या पुरस्काराने सन्मानित करण्याचा दृढनिश्चय करून आजपासून या पुरस्काराची सुरुवात केली आहे, असे सांगून या समारंभाला उपस्थित मान्यवर पाहुणे, र्व उपस्थित कार्यकर्ते, पालक, हितचिंतकांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here