मुंबई : राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाआघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. या पहिल्या अर्थसंकल्पात राज्यातील जनतेला सुखावणारे काही निर्णय जाहीर करण्यात आले तर, काही निर्णयांवरून नाराजीही व्यक्त होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पातील घोषणेनुसार आता राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक रुपयाने वाढ होणार आहे.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार म्हणाले, ‘जगभरात ग्लोबल वॉर्मिंगचे संकट गहीरं आहे. त्यासाठी झाडं लावण्याची गरज आहे. राज्यात अवकाळी पावसाचं संकट सातत्यानं डोकं वर काढत आहे. त्यामुळं सरकारनं पावलं उचलण्याचा निर्णय घेतलाय. राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवर अतिरिक्त कर लावून त्यातून निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यातून उभा राहणारा निधी फक्त आणि फक्त पर्यावरणाच्या कामासाठीच वापरला जाणार आहे.’ राज्य सराकारच्या या निर्णयामुळं पेट्रोल-डिझेल प्रतिलिटर एक रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. बांधकाम व्यवसायाला सध्या मंदीचा फटका बसत आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर तयार घरे पडून आहेत. त्यामुळं बांधकाम व्यवसायाला बुस्टर मिळावा, यासाठी स्टॅम्प ड्युटी अर्थात मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्यात आली आहे, अर्थसंकल्पात अजित पवार यांनी ही घोषणा केलीय. त्यामुळं मुंबई, पुण्यात घर खरेदी करणाऱ्यांचे पैसे वाचणार आहेत.

आदित्य ठाकरे यांची अर्थसंकल्पावर छाप दिसून आली मुंबईतील विविध पर्यटनाला सरकारने चालना दिली आहे. आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुंबईतील विविध पर्यटन कामांसाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. वरळी येथील दुग्धशाळेत आंतरराष्ट्रीय स्तराचे पर्यटन संकुल उभारण्यात येणार आहे. वरळी हा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ आहे. पर्यटन विकासासाठी वरळीला झुकतं माप दिल्याने आदित्य ठाकरे यांची अर्थसंकल्पावर छाप दिसून आली.

‘शिवभोजन’ योजनेला सरकारने आर्थिक बळ गरीब आणि गरजूंना फक्त १० रुपयांत जेवणाची थाळी देणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेला सरकारने आर्थिक बळ दिलं आहे. दररोज एक लाख शिवभोजन थाळी देण्याचे उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषीत केली. पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.
शिवभोजन’ योजनेची २६ जानेवारीपासून राज्यभरात अंमलबजावणी झाली. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सरकारने या योजनेला आर्थिक बळ दिलं आहे. सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या या शिवभोजन योजनेंतर्गत भोजनालयात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम भाजी, १०० ग्रॅम भात, १०० ग्रॅम वरण असलेली थाळी अवघ्या १० रुपयांत देण्यात येणार आहे. रोज १ लाख शिवभोजन थाळी देण्याचा सरकारचा मानस आहे. शिवभोजन थाळी केंद्रांवर ५०० थाळी देण्यात येत असून त्यांची संख्या आता वाढवली जाईल. शिवभोजन थाळीसाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याच पवार यांनी सांगितले. यामुळे जास्तीतजास्त गरीब आणि गरजूंना याचा लाभ मिळणार आहे.

हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे. उद्योग धंद्याना सवलत देण्यात आली आहे. मुद्रांक शुल्कात १ टक्के कपात केली. पीक कर्जांसाठी वनटाईम सेंटलमेंटचीयोजना आणली आहे. त्यामुळे हा सर्वसमावेश अर्थसंकल्प आहे. उद्धव ठाकरे – मुख्यमंत्री

सामान्य माणूस तरुण-तरुणी कामगार वर्ग या सगळ्यांचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार केला आहे. दळणवळणाच्या सुविधा वाढवण्यावर आमचा भर आहे. लोकांना घरं घेणं स्वस्त व्हावं, यासाठी सरकारनं काही निर्णय घेतले आहेत. कोरोनाचं संकट असलं तरी जनतेनं घाबरून जाऊ नये. यापूर्वीही अशी संकटं आली आहेत. त्याचा सामना करू. अजित पवार – अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here