विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा केला गौरव

पनवेल : आज रायगड जिल्हयामध्ये महिला राज आलेले आहे. रायगडच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे आहेत तर राजिप अध्यक्ष म्हणून मी काम पहात आहे तर पंचायत समितीच्या अध्यक्षा व पनवेलच्या महापौर पदी कविता चौतमोल आहेत त्यामुळे रायगडमध्ये आता महिला राज सुरु असल्याचे मत राजिप अध्यक्षा योगिता पारधी यांनी व्यक्त केले. त्या अबोली रिक्षा महिला चालक संघटनेने सेक्टर 7 येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही अगदी चांगले काम करुन दाखवू असे सांगतानाच त्यांनी महिला रिक्षा चालकांचे कौतुक केले. अबोली रिक्षा महिला चालक संघटनेने आज विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांचा गौरव करुन त्यांचे आत्मबळ आणखी वाढवले तर आहेच याच बरोबर अन्य महिलांसाठी ते प्रेरणादायीही ठरेल असे सांगत त्यांनी सर्व उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे अरुण कदम यांनी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. महिलांनी रात्री अपरात्री गरज नसल्यास बाहेर पडू नये असे सांगतानाच जर आपल्यावर कोणता प्रसंग ओढवलाच तर त्यातून आपली कशी सुटका करुन घ्यायची याचे प्रात्यक्षिकासहित उदाहरण दिले. महिला सक्षम झाल्या आहेत मात्र प्रत्येक महिलेला आपले संरक्षण स्वत करता आले पाहिजे त्या करीता प्रत्येक मुलीने, महिलेने मार्शल आर्टसचे धडे घेतले पाहिजेत असे सांगितले. स्वसरक्षाणची खात्री असल्यास महिलांचा नक्कीच आत्मविश्‍वास वाढेल व अजून जोमाने त्या प्रगती करु शकतील. विशेष करुन संस्थेचे अध्यक्ष संतोष भगत यांचे अभिनंदन करत त्यांनी सुरु केलेला हा उपक्रम अतिशय स्त्युत्य असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या आयुष्यात या दिवसाचे अगदी खास असे महत्व असते. आज 21 व्या शतकात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. चुल आणि मुल ही संकल्पना महिलांना कालबाहय करुन दाखवत आपणही कोणत्याही क्षेत्रात कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. अगदी कमी शिकलेल्या महिलांमध्येही काहीतरी करुन दाखविण्याची जिध्द दिसून येते मग अगदी छोटा मोठा व्यवसायही त्या नेटाने करत असतात. अबोली रिक्षा चालक महिला संघटना याचे उत्तम उदाहरण आहे. दोन वर्षापूर्वी संतोष भगत यांनी सुरु केलेल्या या संघटनेने अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे. 8 मार्च रोजी आपल्या दुसर्‍या वर्धापन दिनाचे तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 8 महिलांचा गौरव यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी व आपल्या अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला हसायला लावणारे अरुण कदम उपस्थित होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, दै. वादळवाराचे संपादक विजय कडू, पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष अनिल भोळे, पत्रकार संजय कदम, दिपक घोसाळकर, सुनील कटेकर, अनिल कुरघोडे आदी उपस्थित होते.
या गौरव सोहळयात महाराष्ट्रातील पहिली महिला रिक्षा चालक शालिनी गुरव यांना सावित्रीबाई फुले स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रात गेली 30 वर्षे सेवा देणार्‍या विमल रामचंद्र भगत यांना डॉ. आनंदीबाई जोशी स्मृती गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला. भल्या पहाटे शहरातील रस्ते स्वच्छ करण्याचे काम करणार्‍या कल्पना कांबळे यांना संत गाडगेबाबा स्मृती गौरव पुरस्कार, भारतातील पहिली महिला रिक्षा चालक म्हणून ज्यांची गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डसमध्ये नोंद आहे अशा शिला डावरे यांना आंतराळवीर कल्पना चावला स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या गाण्यातून आगरी संस्कृती परंपरा जतन करणार्‍या गणीबाई म्हात्रे यांना स्वरसम्राज्ञी सरस्वतीबाई राणे स्मृती पुरस्कार बहाल करण्यात आला. तलवारबाजीमध्ये विशेष प्राविण्य प्रात्प असलेल्या तसेच सध्या वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेल्या साधना पवार यांना इंदिरा गांधी स्मृती गौरव पुरस्कार देवून त्यांना गौरविण्यात आले. पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या तसेच अन्यायाला वाचा फोडणार्‍या सुरुचि शिदोरे यांना बाळकृष्ण जांभेकर स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तर अतिशल प्रतिकूल परिस्थितीत पेण सारख्या शहरात आपला दुधाचा व्यवसाय सुरु करुन आपल्या कर्तबगारीने आपले साम्राज्य उभे करणार्‍या उद्योजक रंजना ठाकूर यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी ठाणे, कल्याण येथूनही रिक्षा चालक महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या .या कार्यक्रमाचे निवेदन सुमेधा निमन यांनी खास आपल्या शैलात केले तर आभार संतोष सुतार यांनी मानले. या कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्षा सुलोचना भगत, शालिनी गुरव, खजिनदार ललिता राऊत, सहखजिनदार सुनिता जाधव, सेक्रेटरी विलास जाधव उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर पाटील, हरिष दिवकर, नितीन सांगडे, संतोष गुरव यांनी विशेष मेहनत घेतली.

दोन वर्षापूर्वी लावलेले अबोली रिक्षा महिला चालक संघटनेचे रोपटे आता जोमाने वाढू लागले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अबोली रिक्षा चालक महिला संघटनेचे जाळे विणणार असून आज महिला दिनीच ठाणे येथील शाखेचे सुध्दा उदघाटन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच संपूर्ण महाराष्ट्रभर ही संघटना फोफावेल यात शंका नाही. संतोष भगत संस्थापक/अध्यक्ष अबोली रिक्षा महिला चालक संघटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here