मुंबई: राज्यात करोनाचे १७ रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जीम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. तसेच नागरिकांनी रेल्वे, बसचा प्रवास विनाकारण करू नये, मॉलमध्येही जाणं टाळावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. तसेच राज्य सरकारने मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदाही लागू केला असून तशी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत करोनाबाबतचं निवेदन दिलं. राज्यात करोनाचे एकूण १७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दहा रुग्ण पुण्यातील आहेत. मात्र, या १७ रुग्णांमधील करोनाची लक्षणं गंभीर नाहीत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जिम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. करोनाचा राज्यात फैलाव नाही. मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुण्यातही नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात येत आहे. पुढचे १४ दिवस काळजी घ्यायला हवेत, म्हणून निर्णय घेतला असल्याचंही त्यांनी सांगितलं.
रेल्वे आणि बसेस या अत्यावश्यक सेवा आहेत. त्यामुळे त्या बंद करता येणार नाही. सार्वजनिक वाहतूक अशी बंद करता येणार नाही. मात्र, नागरिकांनी विनाकारण प्रवास करू नये. कारण असेल तरच प्रवास करा, असं सांगतानाच मॉलमध्ये जाणंही नागरिकांनी टाळावं, असं आवाहन त्यांनी केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here