उरण : प्रतिनिधी
जगभरात कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे संकट कोसळले असून, देशात व राज्यात कोरोना बधितांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. या संसर्गजन्य रोगावर अद्याप उपाय मिळालेला नसून, एकमेकांच्या पासून अंतर ठेवून राहणे अधिक गरजेचे असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे उरण शहरातील व्यापाऱ्यांनी काल बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
या उरण शहर बंदला सर्वच व्यापाऱ्यांनी कोणतीही सबब पुढे न करता योग्य प्रतिसाद दिला असून, प्रत्येकाला अत्यावश्यक सेवा असलेल्या मेडिकल स्टोअर्स, किराणा माल आणि दूध व भाजीपाल्याची दुकाने वगळता शहरातील सर्वच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तर शहरातील व तालुक्यातील दुचाकी स्वार तसेच पायी चालणाऱ्या नागरिक व महिलांनी घरातून बाहेर पडतांना तोंडाला मांस लावूनच कोणत्याही कामासाठी बाहेर जाणे पसंत केले असल्याचे चित्र उरणमध्ये दिसत आहे. उरण शहर आणि तालुका परिसरातही 10 पेक्षा अधिक संख्येचा जमाव होईल अशा कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांना उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी परवानगी नाकारली असून, अधिक संख्येने जमाव करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस यंत्रणेला देण्यात आले असल्याचे सांगितले. तालुक्यात अद्याप कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे तहसिलदारांनी सांगितले. एकंदरीत दिवसभरात राज्यसरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन नागरिकांकडून करण्यात येत आहे.