परदेशातून आलेले पेण तालुक्यातील 6 नागरिक स्वतंत्र निगराणीखाली

पेण : जागतिक पातळीवरती धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार व संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दंड थोपटले असून पेण पोलीस स्टेशन, पेण तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय व पेण नगरपरिषदेने अनेक उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये कडेकोट उपायोजना सुरू आहेत तर परदेशातून आलेले पेण तालुक्यातील 6 नागरिक स्वतंत्र निगराणीखाली आहेत.
पेण शहरातील आठवडा बाजार, स्विमिंग पूल, व्यायाम शाळा, शाळा कॉलेजेस, चित्रपट गृह, खाजगी क्लासेस हे यापूर्वीच बंद करण्यात आले असून याचाच पुढील भाग म्हणून शहरातील दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन पेण नगरपरिषदे तर्फे करण्यात आले आहे. औषधांची दुकाने, दूध डेरी, भाजीपाला मार्केट, व पेट्रोल पंप मात्र सुरू राहणार आहेत. शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा कर्मचाऱ्यांची संख्या 50% घटविण्यात आली आहे. पेण ते पनवेल नव्याने सुरू होणारी रेल्वे गाडी सुद्धा अनिश्चित काळा करिता रद्द करण्यात आली आहे. जुन्या रेल्वे गाड्या मात्र नेहमीच्या वेळेत सुरू आहेत.
पेण तालुक्यातील परदेशातून आलेल्या 6 नागरिकांना प्रशासनाने स्वतंत्र कक्षात निगराणी खाली ठेवले आहे. शहरातील मशिदींमध्ये सुद्धा 31 मार्च पर्यंत शुक्रवारची सामूहिक नमाज होणार नाही. कोरोनाच्या भीतीने पेणच्या बाजारपेठा ओस पडल्या असून शहरातील व्यवसायाची गती अतिशय मंदावली आहे. तोंडाचा मास्क, सँनेटायझर व हॅन्ड ग्लोज यांना मात्र दिवसेंदिवस मागणी वाढतच चालली आहे़.