डाॅ. तुषार शेट यांची उपयुक्त माहीती

उतेखोल / माणगांव ( रविंद्र कुवेसकर )

कोरोना संसर्गाने बाधित होणाऱ्यांचे प्रमाण अधिक वाढल्याने जनते मध्ये चिंतेचे वातावरण आहे म्हणून काय काळजी घ्यावी तसेच कोरोना संसर्ग झालेल्या कार्यालयात किंवा घरात अथवा आपल्या शेजारी आजूबाजूला असा प्रसंग कोणावरही येऊ शकतो, गोंधळून न जाता धैर्याने आपण यावर मात करु शकतो त्यासाठी माणगांवचे सूपूत्र उपजिल्हा रुग्णालयामधील कोव्हिड केंद्राचे वैद्यकिय अधिकारी सामान्य चिकित्सक एमडी डाॅ. तुषार घनश्याम शेट यांच्याकडून जनजागृतीच्या दृष्टीकोनातून घेण्यात आलेली उपयुक्त माहिती –

कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या घरातील सगळ्यांनाच संसर्ग होतो का? शेजारील कुटुंब त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहतात, भीतीचे वातावरण असल्याने हा प्रकार वाढत आहे या बद्दल आपले काय मत आहे?

कोरोनाचा संसर्ग झालेली व्यक्ती म्हणजे कोव्हीड पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे घरचे सर्व (हाय रिस्क) उच्च धोक्यामध्ये असतात, त्यात मुख्यतः १५ वर्षाखालील लहान मुले किंवा वयोवृद्ध लोक येतात पण प्रत्येक जण हा पॉझिटिव्ह आहेच असे पाहणे चुकीचे, त्यांनी जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन स्वतःचे स्क्रीनिंग म्हणजेच प्राथमिक तपासणी करून ताप-सर्दी-खोकल्यासम लक्षणे असल्यास टेस्ट करून घेणे गरजेचे तसेच त्या कुटुंबाने १४ दिवसाचे (सेल्फ-क्वारंटाईन) स्वयं – विलग्नवास करून स्वतःचे निरीक्षण करावे, काही त्रास झाल्यास संबंधित रुग्णालयात लगेच कळवावे. शेजारी पाजारी राहणाऱ्यांना जरी जवळ जाऊन नैतिक आधार देता आला नाही तरी (फिजिकल डिस्टंसिन्ग) भौतिक अंतर राखून त्यांना लागेल ती मदत करावी, त्यांच्या कडे वेगळ्या नजरेने पाहू नये, आलेले संकट हे जसे त्यांच्या घरावर आहे तसेच ते आपल्यावरही येऊ शकते हे समजून सामाजिक भान राखून माणुसकीने मदत करणे व गरजेची औषधे व रोज लागणारे घरगुती सामान त्यांना शेजारधर्मात आणून देणे गरजेचे.

नोकरी कामाच्या ठिकाणी एखादी संसर्ग झालेली व्यक्ती सापडली तर सगळेच सोबतचे सहकारी घाबरतात, जवळ असलेल्या लोकांना तातडीने स्वॅब चाचणी करणे गरजेचेच आहे का?

कामाच्या ठिकाणी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या इतरांनी घाबरून न जाता मास्कचा वापर करणे गरजेचे, एकटे असल्यासच मास्क काढणे व ते हि थोड्या वेळाकरिता. सध्यातरी जेवणाचा डबा आपापल्या केबिन मधेच किंवा जमल्यास वेगळे बसूनच खाणे, जेवण जेवल्याने कोरोना पसरत नाही पण जेवताना लागणार ठसका किंवा आलेली शिंक यांनी एरोसॉल्स तयार होतात त्यातून संक्रमण होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. स्वॅब चाचणी लगेच करणे गरजेचे नाही पण आपले वय जर ५० हुन अधिक असेल किंवा रक्तदाब व मधुमेह असेल तर तपास करणे सोयीचे, दर वेळेस ऑफिस मध्ये कोणी पॉझिटिव्ह आल्यास ऑफिस बंद ठेवणे किंवा सील करणे शक्य नाही म्हणून योग्य ती खबरदारी घ्या कि तुम्हाला स्वतःवर विश्वास असायला हवा, मी ऑफिस मध्ये असताना मास्क काढत नाही… म्हणजे मला संसर्ग नक्की झाला नसणार, स्वॅब तेव्हाच करावा जेव्हा लक्षणे दिसून येतील.

कधी कधी असे होते कि तुम्ही तातडीने चाचणी करून घेता पण ती निगेटिव्ह येते आणि दोन दिवसांनंतर तुम्हाला कोव्हीड ची लक्षणे दिसून येतात आणि तुम्ही चाचणी करत नाही, कारण आपण भ्रमात असतो कि आपण कोव्हीड निगेटिव्ह आहोत आणि आपण पुन्हा टेस्ट करण्यास जात नाही, त्यामुळे नंतर तब्येत अति गंभीर होण्याची शक्यता असते. प्रत्येक ऑफिस मध्ये तापमान (टेम्परेचर) तपासण्यासाठी टेम्परेचर गन आणि पल्स ऑक्सिमीटर असणे तसेच रोज देखरेख होणे सध्या गरजेचे.

कोणतीही लक्षण नसलेल्यांच्या कर्मचाऱ्यांच्या घरातील सोबतच्या सगळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे का ?

नाही, आधी सांगितल्याप्रमाणे जर खूप जवळचा संबंध असेल किंवा बाजूला बसणारी व्यक्ती किंवा संगणकावर सतत सोबत काम करत असाल तर अश्या लोकांनी टेस्ट करून घेणे गरजेचे, पण येता-जाता साधारण संपर्क किंवा लांबून हाय-हॅलोचा संपर्क असलेल्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना टेस्ट करण्याची गरज नाही. लक्षणे दिसून आली तरच टेस्ट करा किंवा मधुमेह व उच्च रक्तदाब किंवा जुना टी. बी, एच आय व्ही किंवा गर्भारपणा असेल तरच टेस्ट करा.

शहरातील संपूर्ण कुटुंबांची स्वॅब चाचणी मोहीम करणे गरजेचे आहे का? एक तज्ञ डाॅक्टर म्हणुन आपले काय मत आहे?

कारण नसताना स्वॅब चाचणी करण्यामध्ये काही उपयोग नाही, शक्यतो तुम्ही आज कुठेही कोणाच्या संपर्कात नसाल, लॉकडाऊन व्यवस्थित पाळत असाल त्या मुळे तुम्ही निगेटिव्ह याल पण नंतर संक्रमित झालात तर पुन्हा चाचणी करणे गरजेचे राहील, म्हणून कारण नसताना चाचणी करण्यापेक्षा नियमित स्क्रिनिंग म्हणजेच टेम्परेचर चेकिंग आणि रक्ताची ऑक्सिजन संपृक्तता (SpO2) पातळी तपासत राहणे गरजेचे.

सर्व कामकाज दैनंदिन व्यवहार सोडून बंद पाळावे का ? कोरोना विषयी भितीचे वातावरण असून जनजागृती म्हणुन आपला संदेश ?

सध्या कोरोना सोबत जगणे आपल्या सर्वांना शिकावे लागणार… कोरोना इतक्या लवकर कुठेही जाणार नाही, आरोग्य यंत्रणांवर आलेला दबाव दिसून येत आहे, लोकांना ICU बेड किंवा व्हेंटिलेटर मिळत नाही, त्यामुळे घाबरण्यापेक्षा कारणाव्यतिरिक्त बाहेर जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी जावे, जितके होईल तितका वेळ मास्क वापरणे आणि योग्य ती खबरदारी घेणे, मी सध्या मजेत नेहमी म्हणतो कि डिसेंबर २०२१ पर्यंत आपण जिवंत राहिलो तर मग आपण सगळे सुटलो…

“पँडेमिक” पेक्षा कोरोना हा एक “इंफोडेमिक” आहे, लोक विनाकारण खूप घाबरले असून व्हाट्स एप आणि इतर सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरून दाखवली जाणारी नकारात्मक भीतीदायक माहिती यामुळे समाजमनावर चुकीचा परिणाम झाला आहे.

कोरोनावर अनेक प्रतिबंधात्मक उपाय सांगितले जातात परंतु कोरोना झाल्या नंतर नेमके काय उपचार केले जातात ? या रुग्णांचा दिनक्रम आणि उपाय ?

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचा साधारण दिनक्रम हा असा असतो कि ज्यांना सौम्य लक्षणे असतात त्यांना ज्या वॉर्ड मध्ये ठेवले जाते तेथे येताना वाचण्यासाठी पुस्तके किंवा लहान मुलाना चित्रकलेसाठी ची साधने किंवा आवड असलेले काहीहि घेऊन येणास सांगितले जाते जेणेकरून त्यांना त्यांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मदत होते, सौम्य रुग्णांसाठी आराम खूप महत्वाचा असतो, तसेच वॉर्ड च्या आतमध्ये त्यांना थोडासा व्यायाम म्हणून चालायला सांगितले जाते.

त्यांना औषधे सकाळी आणि संध्याकाळी दिली जातात, त्यामध्ये तापमान आणि ऑक्सिजन संपृक्तता पातळी तपासणी केली जाते, रुग्णांचे योग्य ते समुपदेशन केले जाते, सुरुवातीचे दोन दिवस रुग्ण घाबरलेला असतो पण नंतर ताप आणि इतर लक्षणे कमी झाल्यास त्यांची भीती दूर होते, आणि आपल्याला परत घरी कधी जाता येईल याची उत्सुकता लागलेली असते. औषधांमध्ये मुख्यतः अँटी-बायोटिक व अँटी-वायरल दिले जातात, पण चांगला आहार आणि दिवसातून २-३ लिटर पाणी पिणे फार गरजेचे.

मला कोरोना झालाय हे सांगायला लोक घाबरतात, ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे, रोग्याशी नाही आपल्या सर्वांना मिळून रोगाशी लढायचं आहे हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे, मित्रांनो माणगाव उपजिल्हा रुग्णालयात कोव्हीड-१९ साठी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ . तुषार घनश्याम शेट MBBS , MD (General Medicine) यांनी दिलेली सदर उपयुक्त माहिती नीट वाचली असाल तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल यापुढे न घाबरता योग्य ती काळजी घेऊन कोव्हिड -१९ वर मात करणे सहज व सोपे आहे.

घाबरून जाण्याचे कारण नाही, आपण काळजी घ्या आणि जनजागृती करा, सुरक्षित रहा!