पनवेल :- कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महानगरपालिकेच्या काही जबबाबदार अधिकारी व कर्मचारी हे कोरोनाच्या विळख्यात आले असल्याने खबरदारी म्हणून निर्जंतुकीकरण करण्यासाठी मुख्यालय पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. तथापि क्षेत्रीय कार्यालय मात्र चालूच राहतील. पनवेल महानगरपालिकेमध्ये अत्यंत मर्यादित कर्मचारी वर्ग आहे. कमीतकमी मनुष्यबळाच्या माध्यमातून कोरोना विरोधात लढा सुरू आहे. १० मार्च २०२० पासून कोरोना साथरोग नियंत्रणासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचारी , या कामासाठी खास करून नियुक्त केलेले डॉक्टर्स , नर्सेस , सफाई कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोणत्याही सुट्टी शिवाय ते कर्तव्य बजावत आहेत . दरम्यान पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयातील काही कर्मचारी व कोरोनासाठी स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षातील काही जबाबदार कर्मचारी यांच्या कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या आहेत . त्यामुळे शुक्रवार दिनांक १० व शनिवार दिनांक ११ जुलै २०२० हे दोन दिवस महानगरपालिकेचे मुख्यालय निर्जंतुकीकरणासाठी बंद ठेवण्यात येणार आहे . क्षेत्रीय पातळीवर काम करणारे सर्व आरोग्य केंद्र सुरू राहणार आहेत. कोरोना नियंत्रणासाठी संबंधित पथके व महानगरपालिकेमधील कार्यरत अधिकारी त्यांचे काम दूरध्वनीवरून किंवा घरी राहून पाहतील असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे .