पनवेल : अंजुमन- ए- इस्लाम या अग्रणी शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या, एन.बी.ए. मानांकन प्राप्त अब्दुल रझ्झाक काळसेकर पॉलिटेक्निक, पनवेलद्वारा नुकतेच ऑनलाईन माध्यमातून १० वी, १२ वी व आय.टी.आय. विद्यार्थ्यांसाठी ‘करिअर मार्गदर्शन व पदविका अभियांत्रिकीमधील संधी’ या विषयावर निशुल्क वेबिनारचे आयोजन करण्यात आले. १०वी , १२ वी तसेच आय .टी .आय विदयार्थ्यांसमोर अनेकदा करिअर निवडीबाबत प्रश्न असता. बऱ्याचदा विद्यार्थ्यांसमवेत पालकही करिअर निवडीबाबत संभ्रमित असतात . विद्यार्थ्यांच्या अशा प्रश्नांना योग्य उत्तरे मिळावीत, तसेच अनुभवी, प्रशिक्षित तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी आणि पालकांना लाभावे या हेतूने दर वर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन काळसेकर पॉलिटेक्निक आपल्या भव्य कॅम्पस मध्ये करत असते. या वर्षी कोविड प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा विचार करता हा मार्गदर्शनपर वेबिनार ऑनलाईन माध्यमांतून संपन्न झाला. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच जिल्ह्यांसमवेत, देशभरातील विविध ६ राज्यांतील सुमारे १५० हून अधिक शाळा, महाविद्यालयांतील १३०० हून अधिक विद्यार्थी तसेच पालक, शिक्षक आदींनी या निशुल्क वेबिनार मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अंजुमन- ए – इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी यांच्या अध्यक्षतेत संपन्न या वेबिनार मध्ये संस्थेचे जनरल सेक्रेटरी जी .ए.आर. शेख , खजिनदार मोईज मियाजीवाला, अंजुमन- ए – इस्लाम, नवी मुंबई शिक्षण संस्थांचे एक्झिकेटिव्ह चेअरमन बुरहान हरिस यांसमवेत डी. टी . ई . चे सहायक संचालक जे. आर. निखाडे , आर. बी.टी.ई. चे सहायक सचिव बी .व्ही. कऱ्हाडे, विशेष अधिकारी सौ. सदफ शेख, जी ओ कंपनीचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट डॉ . मुनीर  सय्यद या दिग्गज व अनुभवी मान्यवरांनी  वेबिनार मधील उपस्थितांशी संवाद  साधत त्यांना करिअर  निवडी बाबत  आणि  पदविका अभियांत्रिकीनंतरच्या उपलब्ध संधींबाबत सुयोग्य मार्गदर्शन केले. अंजुमन-ए-इस्लाम स्कूल कमिटीचे पदाधिकारीही या ऑनलाईन वेबिनारमध्ये उपस्थित होते. वेबिनारच्या द्वितीयसत्रात उपस्थित शंकांचेही  निरसन करण्यात आले. वेबिनार मधील सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल इ – सर्टिफिकेट देखील देण्यात आले . काळसेकर पॉलिटेक्निकच्या अधिकृत युट्युब चॅनेल च्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालक हा वेबिनार परत पाहू शकतात. काळसेकर टेक्निकल कॅम्पस चे संचालक डॉ. अब्दुल रझ्झाक होनुटगी आणि काळसेकर पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा. रमजान खाटीक यांच्या शिस्तबद्ध नियोजनांतर्गत पार पडलेल्या या वेबिनार च्या यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा . फरहान मुसा आणि त्यांच्या चमूने अथक परिश्रम घेतले. कोवीड चा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन सारख्या प्रतिकूल परिस्थितीही विद्यार्थ्याचे हित जोपासत अनेक विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबविणाऱ्या काळसेकर पॉलिटेक्निकच्या वेबिनार चे खास कौतुक  विद्यार्थी आणि पालकांकडून होत आहे.