मुरूड : (गणेश चोडणेकर) निसर्ग वादळाने मोठा फटका सहन कराव्या लागलेल्या मुरुड तालुक्यातील शहरासह गावोगावच्या वाडी,पाखाडी,गल्ली बोळातील वीज पुरवठा दीड महिन्यानंतरही अद्याप सुरळीत झाला नसून जेथे सुरु झाला आहे तेथिल वीज पुरवठाही सातत्याने खंडीत होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने तो सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञ अभियंत्यांना अथवा कुशल तंत्रज्ञाना बोलावून या समस्येवर मात करावी अशी मागणी मुरुडच्या वीज ग्राहक नागरिकांनी महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यासह राज्याच्या वीज पुरवठा मंत्र्यांकडे केली आहे.
मुरुडला सुरळीत वीज पुरवठा व्हावा म्हणून कोकबन-सुपेगाव या जंगल मार्गा ऐवजी म्हसळा तालुक्यातील पाभरे येथून उच्च दाबाच्या वीज वाहक तारा व खांबा व्दारे मुरुड शहरातील दत्तवाडी येथिल स्विचिंग सेंटर पर्यंत वीज आणल्याने सर्वांनी सुटकेचा मोकळा श्वास सोडला होता.परंतु तिन जून रोजी झालेल्या निसर्ग वादळाने सदर खांबे मुळापासून उखडून जमिनदोस्त झाले ,तारा तुटल्या. वास्तविक मुरुड शहरातील आंबा ,नारळ, सुपारी, वड आदी मोठ मोठी झाडे पडल्याने खांबे केवळ वाकले पण मुळापासून उखडले नाहीत. या वरुन पाभरे मार्गावरिल ठेकेदाराने केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे होते खांबे उभारण्यास खोदण्यात आलेले खड्डे उथळ होते हे सिध्द होते. याची सखोल चौकशी करुन संबंधीत ठेकेदार व अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. वादळानंतर शहरातील प्रत्येक विभागातील संबंधित वीज कर्मचार्याने प्रत्यक्ष पहाणी करुन दुरुस्त्या करणे आवश्यक होते तसे न केल्यामुळे ग्राहकांना पंधरा-विस दिवस नाहक मनःस्ताप सहन करावा लागला. शहरातील अनेक नागरिक व तारतंत्री तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन झाडे तोडणे,खांबे उभारण्यास खड्डे खोदणे, नवीन खांबे उभे करणे ,वाकलेल्यांना सरळ करणे, तारा ओढणे, खांब्यावर चढून काम करणे आदी कामे केली असतांनाही अभियंता येरेकर व उप अभियंता किंजे यांचे वर्तन उद्दामपणाचे होते. केवळ अशा अकार्यक्षम अधिकार्यांच्या हलगर्जीपणामुळे ग्राहकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचीही चौकशी करून त्यांची येथून बदली करावी.
सद्यस्थितीत सुरु करण्यात आलेला वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत आहे कमी जास्त होणार्या दाबामुळे अनेक ग्राहकांची किंमती वीज उपकरणे नादुरुस्त होऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. म्हणजेच आतापर्यंत झालेले काम हे व्यवस्थित नसल्याने व सुरु असलेल्या पावसाळी हंगामात त्यात अधिक मोठा बिघाड होऊ शकतो व ग्राहकांचे मोठे नुकसान होऊ शकते.अनेक दिवस काम करुनही येथिल तांत्रिक दोष दुरुस्त करणे त्यांना जमत नाही. या करीता एखाद्या तज्ज्ञ अभियंता अथवा कुशल तांत्रिकाला बोलावून सदरचे दोष निपटून काढून मुरुडचा वीज पुरवठा अखंडीत व सुरळीत करावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
सदर निवेदनावर रमेश खोत, उदय चौलकर, दत्ता भोसले, प्रकाश विरकुड, संजय डागे, गोविंद जोशी, जाहिद फकजी, अविनाश भगत, दीपक पाटील, राकेश भायदे, अस्लम हमदुले, अमित कौलकर, प्रदिप गुरव, वसिम उल्डे, जगदिश पाटील आदींनी स्वाक्षर्या केल्या आहेत.