पनवेल : इंडियाबुल्स कोन येथील विलगीकरण कक्षामध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रशांत ठाकूर , महापौर कविता चोतमोल यांनी भेट दिली. यावेळी महिलांच्या संरक्षणासाठी दिशा कायदा लागू करावा आणि या घटनेतील आरोपीसह सुरक्षारक्षक आणि प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. पनवेल- कोन येथील विलगीकरण कक्षात एका 40 वर्षीय महिलेवर 16 जुलै रोजी 25 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे प्रकार घडत असल्याने  या ठिकाणी महिला सुरक्षित नसल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. या घडलेल्या प्रकारामुळे कोरोनाग्रस्त महिलेने कोरोना कोरंटाईन सेंटरमध्ये उपचारासाठी जायचे नाही का ? की महिलांनी घरातल्या घरातच मरायचे असा सवाल चित्रा वाघ यांनी सरकारला विचारला आहे. राज्यात अनेक ठिकाणी कोरोना विलगिकरण कक्षामध्ये महिला आणि मुलींसोबत विनयभंगाचे प्रकार घडले आहेत. महिलांच्या संरक्षणासाठी दिशा कायदा येणार होता, मात्र महिलांवरील वाढते अत्याचार व खून रोखण्यासाठी हा कायदा अद्याप आला नसल्याने तो कधी अस्तित्वात येणार असा सवाल वाघ यांनी शासनाला विचारला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे करणार्‍या आरोपींच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. या आरोपीला लवकरात लवकर अटक व्हायला हवी. तसेच आरोपीसह सुरक्षारक्षक आणि प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपीची एंटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे तर पीडित महिलेची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली आहे.