पनवेल : शहराच्या सौदंर्यात भर घालण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून सुशोभीकरणाचे काम सुरु असलेल्या वडाळे तलाव परिसरात मद्यपींचा वावर वाढला असून,मद्यपिंकडून रिकाम्या झालेल्या बाटल्या तलावातच फेकल्या जात असल्याने तलावाच्या पाण्यात सर्वत्र रिकाम्या बाटल्या तरंगताना दिसत आहेत.
शहरात असलेल्या वडाळे तलावाला ऐतिहासिक महत्व असून,तलाव परिसरात असललेल्या बल्लाळेलश्‍वर मंदिरामुळे तलाव परिसराला धार्मिक महत्व देखील आहे. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने ऐतिहासिक तसेच धार्मिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या या तलावाचे शुशोभीकरण करून शहराच्या वैभवात भर घालण्याच्या दृष्टीने तलाव परिसराच्या सुषभीकरणाचा निर्णय पालिके मार्फत घेण्यात आला असून जवळपास 12 कोटी रुपये खर्च करून पालिकेच्या वतीने तलाव परिसरात पाथवे, कारंजे, कठडे, विसर्जन घाट, वाहन तळ,खाद्य पदार्थ विक्री करिता स्टॉल तसेच तलावात उतरण्याकरिता पायर्‍यांची निर्मिती करण्यात येत आहे. पालिकेतर्फे सुरु असलेले हे काम जवळपास 70 ते 75 पूर्ण झाले असल्याने आता पासूनच हा परिसर नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करू लागल्याने सकाळचा आणि सायकाळचा फेरफटका मारणार्‍या जेष्ठ नागरिकांची गर्दी तलाव परिसरात होत असून, तलाव परिसरात बांधण्यात आलेल्या कठड्यांवर गप्पा मारण्यासाठी महाविद्यालयीन तरुण तरुणीचे घोळके देखील पसंती देत असल्याचे पाहायला मिळत असतानाच सायंकाळच्या वेळेत तलावाच्या काठावर बांधण्यात आलेल्या पायर्‍यांवर बसून मद्यपान करणार्‍या मद्यपींचा देखील वावर वाढला असून तलावाच्या पाण्यात रिकाम्या झालेल्या बाटल्या फेकण्यात येत असल्याने सुशोभीकरणाचे काम पूर्ण होण्या पूर्वीच तलाव परिसराला बकालतेचे स्वरूप येत असल्याची खंत जेष्ठ नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
तरुणाई कडून विकृत चाळे
पनवेल परिसरात असलेल्या महाविद्यालयातील अनेक तरुणतरुणी देखील वडाळे तलाव परिसरात फिरताना दिसत असून, काही तरुण तरुणी इतरांना लाजवतील असे चाळे करण्यासोबत खुल्यावर बिनदिक्कत धूम्रपान करत असल्याने काही नागरिकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त करत आहेत.
रात्रीच्या वेळेत आईस्क्रीमच्या गाड्या आणि वारागणांचा वावर
तलाव परिसरातील विद्युत रोषणाईचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने सायंकाळ होताच आईस्क्रीम विक्री करणार्‍या गाड्या तसेच देहविक्री करणार्‍या महिलांचा वावर तलाव परिसरात वाढत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

तलाव परिसरात वाढत असलेले गैरधंदे नियंत्रणात आणण्याचे काम केवळ प्रशासन अथवा पोलिसांनी करायचे नसून सुजाण नागरिकांनी देखील पुढाकार घेऊन आशा गोष्टींवर निर्बंध घालण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
– अर्चना कुळकर्णी, शिवसेना महिला आघाडी पनवेल शहर संघटक.

तलावाचे ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्व पाहता तलाव परिसरात गैरकृत्यांना आळा बसावा या करिता आता पासूनच सुरक्षा रक्षक नेमणूक करणे गरजेचे झाले आहे.
– संदेश भगत. नागरिक. पनवेल.

सुशोभीकरण पूर्ण झाल्यावर सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी तलाव परिसरात कार्यालय तयार करण्यात येत असून भविष्यात या ठिकाणावरून इतर गैर कृत्यानवर देखील नियंत्रण ठेवले जाणार आहे.
– संजय कटेकर. अधिकारी बांधकाम विभाग, पालिका.