घारापुरी बेटावरील जागतिक महाशिवरात्री उत्सवावर शासनाच्या बंदीचे आदेश

0
74

उरण : प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी 11 मार्च रोजी घारापुरी बेटावर भरविण्यात येणारा जागतिक महाशिवरात्रीचा उत्सव शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आला आला आहे. त्यामुळे दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी बेटावर घुमणारे बम…बम… भोलेचे सूर यंदा बेटावर घुमणार नाहीत.
मुंबईपासुन अवघ्या 11 किमी अंतरावर असलेले घारापुरी बेट सहाव्या शतकातील प्राचिन शिवकालीन लेण्यांमुळे कायम जागतिक प्रसिध्दीच्या झोतात राहिले आहे. काळ्या पाषाणात शिवाची विविध रुपे असलेली अनेक प्रचंड शिल्प आहेत. मोठ्या खुबीने कोरलेल्या शिल्पांमध्ये अर्धनारीश्‍वर शिव,कल्याणमुर्ती,अंधकासुरवध,गंगावतारण शिव, योगीश्‍वर उमामहेश्‍वरमुर्ती, आणि 20 फुट उंच आणि रुंदीची महेशमुर्ती आदि शिल्पांचा समावेश आहे.
महाशिवरात्री निमित्ताने बेटावरील या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक आणि शिवभक्त येतात.त्यामुळे घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्री म्हणूनही ओळखली जाते.घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने हजारो शिवभक्त येतात.यामध्ये देशी -विदेशी पर्यटक आणि शिवभक्तांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. शिवदर्शनासाठी येणार्‍या विदेशी पर्यटकांमुळे बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्र म्हणुनही ओळखळी जाते.बेटावर जाण्या-येण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया,जेएनपीटी,उरण-मोरा,न्हावा बंदरातून होड्या,लॉचेस,मचव्यांची सोय असते. मात्र यावर्षी मात्र कोरोनाच्या वाढत्या पाश्र्वभूमीवर घारापुरी बेटावर भरविण्यात येणाऱ्या महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यावर शासनाने प्रतिबंध घातले आहेत.
आज 11 मार्च 2021 रोजी महाशिवरात्री निमित्त गेटवे ऑफ इंडिया,जेएनपीटी,उरण – मोरा,न्हावा बंदरातून घारापुरी बेटावर सागरी मार्गाने येणाऱ्या होड्या, लॉंच,मचव्यांनाही सक्तीची बंदी घालण्यात आली आहे.शिवभक्त भाविकांनी शासनाने घातलेल्या बंदीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन घारापुरी ग्राामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी भाविकांना केले आहे.दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने घारापुरी बेटावर घुमणारे बम…बम… भोलेचे सूर यंदा बेटावर घुमणार नाहीत. यामुळे शिवभक्तांचा विरस होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here