उरण :
उरण तालुक्यात जेएनपीटी बंदरातील आयात – निर्यातीच्या अनुषंगाने जेएनपीटीच्या निर्मिती पासून मागील 32 वर्षांत विविध प्रकारचे खाजगी कंटेनर गोदामे साकारण्यात आली.या ही गोदामे साकारण्यासाठी तालुक्यातील ठिकठिकाणी मोठ्या मातीचे भराव करण्यात आले. या भरावांसाठी लागणारी माती सर्रास जासई, जांभूळपाडा, दिघोडे, विंधणे, चिरनेर, कंळबसरे, वशेणी, पिरकोन, सारडे, आवरे व अन्य उरण पूर्व विभागातील गाव परिसरातील डोंगरातून पोकलन यंत्राच्या साहाय्याने काढून नेल्याने त्यामध्ये अनेक प्रकारची औषधी वनस्पती उध्वस्त करण्यात आली. या शिवाय आजतागायत वाढत्या गोदामांच्या भरावासाठी नियमित मातीचे उत्खनन करण्यात येऊन भरावाची कामे सुरूच आहेत.
त्याच प्रमाणे सध्या याच उरण तालुक्यातील पूर्व विभागात विविध ठिकाणी तथाकथित विकासकांकडून सीआरझेड कायद्याचे उल्लंणघन करून खाडीकिनारी असलेल्या खारफुटीच्या वृक्षांची बेसुमार कत्तल करून सदरची खारफुटीची उध्वस्त करण्यात येत असलेली वृक्षे महसूल खात्याला धूळ चारून, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पोकलन यंत्राने डंपरमध्ये भरून दूरच्या ठिकाणी पार्सल करून गायब करण्याचे कारस्थान येथील विकासक करीत आहेत. खाडीकिनाऱ्याची जागा मोकळी करून त्या ठिकाणी बेकायदेशीर भराव करून अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या तालुक्यात अधिक प्रमाणात वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी कंटेनर गोदामे आणि तथाकथित विकासक यांच्याकडून करण्यात येत असलेल्या मातीच्या भरामुळे पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नाल्याचे स्रोत बंद झाल्याने येथील गावातीला घरांना पुराच्या पाण्याचा फटका बसू लागला आहे.
त्यात काही महसुली जमिनीवरीलही भरवामूळेही खाडी जवळ असलेल्या व अन्यही महसुली गावांना खाजगी भरावांनी वेढा दिला असून,यामुळे पावसाळ्यात अनेकांचे घरात पुराचे पाणी शिरून अन्न धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या अतोनात नुकसान झाल्याच्या घटना मागील 19 जुलै रोजी उरण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घडल्या आहेत. पुरामुळे नुकसान झालेल्या घरांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.मात्र या रहिवाशांना आजतागायत पुरातील नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे येथील जनसामान्यांना भरावामुळे पुराचे पाणी घरात शिरून झालेल्या नुकसानीचा सामना दरवर्षी करावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यातील होत असलेल्या अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान आणि त्यावर कोणती उपाय योजना करावी, यासाठी राज्यकर्त्यांना वेळच नाही.घटना, दुर्घटना घडेल तेवढ्या पुरती वचनपूर्ती केली जाते. मात्र दरवर्षी तालुक्यात होणाऱ्या प्रचंड प्रमाणातील मातीचे भराव यांना आळा घालण्यासाठी शासनाकडून प्रयत्न देखील होत नसल्याने गावपरिसरातील गरीब व सामान्य नागरिकांना त्याचा मोठ्ठा फटका बसत आहे.त्यामुळे अशा मातीच्या भरावांमुळे होणाऱ्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती पाहणी करून पूरपरिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या कंटेनर गोदाम आणि इतर कामासाठी भराव करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मोहीम हाती घेण्यात यावी अशी मागणी सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.