राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर; राज्यस्तरीय स्पर्धेत ‘दुर्ग’ ने तर जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘साहित्य आभा’ ठरले मानकरी

0
10214

पनवेल : शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘दुर्ग’ अंकाने तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत ‘साहित्य आभा’ य दिवाळी अंक प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले, असल्याची  माहिती श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शुक्रवार, दि. ०७ ऑक्टोबर) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तर या दिवाळी अंक स्पर्धेपासून बक्षिसांच्या रक्कमेत वाढ केली असल्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केले. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ७५ हजारावरून ०१ लाख रुपये, तर जिल्हास्तरीय स्पर्धेत ३० हजारांचे बक्षिस ४० हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच इतर पारितोषिकांच्या रक्कमेतही वाढ करण्यात आली असून राज्यातील सर्वात मोठ्या या दिवाळी अंक स्पर्धेने साहित्यिक, लेखक, कवी, वाचक आणि दिवाळी अंकांचा सन्मान अधिक वृद्धिंगत केला आहे.

पनवेल शहरातील मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धेचे संयोजक दीपक म्हात्रे आदी उपस्थित होते.

 आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले कि,  सन २०२१ च्या अर्थात २१ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत नाशिक येथील अंकुर काळे यांच्या ‘दुर्ग’ अंकाने प्रथम क्रमांक पटकाविला. पुणे येथील डॉ. वंदना बोकील- कुलकर्णी यांच्या ‘संवाद सेतू’ आणि पुणे येथील हेमंत पोतदार यांच्या ‘व्यासपीठ’ अंकाने द्वितीय (विभागून), तृतीय क्रमांक(विभागून) जळगाव येथील नामदेव कोळी यांच्या ‘वाघूर’ आणि सोलापूर येथील इंद्रजित घुले यांच्या ‘शब्दविचार’ अंकाने मिळविले.  तसेच उत्कृष्ट कथेचे बक्षिस ‘अक्षरधारा’ अंकातील ‘देव करो’ या कथेने, उत्कृष्ट कविता ‘शब्दरूची’ दिवाळी अंकातील सदानंद डबीर यांनी, उत्कृष्ट व्यंगचित्र गजानन घोंगडे यांनी, उत्कृष्ट विशेषांक दिनकर शिलेदार यांच्या ‘ मी’ अंकाने तर उत्कृष्ट मुखपृष्ठाचे बक्षिस रामनाथ आंबेरकर यांच्या ‘ किल्ला’ या अंकाने पटकाविला आहे. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रतिभा सराफ, रविप्रकाश कुलकर्णी, अरविंद दोंदे, श्रीकांत नाईक या साहित्यिक मंडळींनी काम पहिले.

          रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत शारदा धुळप यांच्या ‘साहित्यआभा’ अंकाने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला आहे.  द्वितीय क्रमांक प्रमोद वालेकर यांच्या ‘दैनिक किल्ले रायगड’ अंकाने, तृतीय क्रमांक शुभदा पोटले यांच्या ‘म्हसळा टाइम्स’ अंकाने तर उत्तेजनार्थ बक्षिस रत्नाकर पाटील यांच्या श्री समर्थ विचार आणि नाना करंजुले यांच्या कर्तृत्व अंकाने पटकाविले आहे.

          राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस ०१ लाख रुपये, व्दितीय क्रमाकांस ५० हजार तर तॄतीय क्रमाकांस ३० हजार रूपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील उत्कॄष्ट कथेसाठी ०७ हजार रूपये, उत्कॄष्ट कविता, उत्कॄष्ट व्यंगचित्र, उत्कृष्ट विशेषांक व उत्कृष्ठ मुखपृष्ठ यांना प्रत्येकी ०५ हजार रुपये, तसेच रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रूपये, व्दितीय क्रमांकास २० हजार रूपये आणि तॄतीय क्रमाकांस १० हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ०५ हजार रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप असून दिपावलीनंतर आयोजित करण्यात येणाऱ्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कॄतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी, यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने गेल्या २१ वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आणि या स्पर्धेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. कितीही संकटे आली तरी दिवाळी अंकांच्या १११ वर्षांच्या परंपरेत खंड पडलेला नाही. वाचकांची संख्या घटत आहे, अशी ओरड दरवर्षी होते, मात्र तसे न होता दर्जेदार साहित्यामुळे दिवाळी अंकांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हि अंक निर्माते, साहित्य दर्दी वाचकांसाठी सुखावह बाब असून हि साहित्य परंपरा अखंडित ठेवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आश्वासित केले.