कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक : मतदान सोमवार ३० जानेवारी तर ०२ फेब्रुवारी रोजी मतमोजणी

0
232

नवीमुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ व्दिवार्षिक निवडणूक २०२३ करिता सोमवार, दि. ३० जानेवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी गुरुवार दि. ०२ फेब्रुवारी, २०२३ रोजी होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कोकण विभाग शिक्षक मतदार संघ यांनी दिली.
भारत निवडणूक आयोगाच्या दि. २९ डिसेंबर २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये कोकण
विभाग शिक्षक मतदारसंघाची व्दिवार्षिक निवडणूक २०२३ चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे पाच जिल्हे समाविष्ट आहेत. या पाच जिल्हयांतून दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचारी मतदान साहित्यांसह मतदान केंद्रांवर रवाना होतील.
मतदान सोमवार दिनांक ३० जानेवारी,२०२३ रोजी सकाळी ०८.०० ते दुपारी ०४.०० या कालावधीत होणार आहे. या निवडणूकीकरीता नव्याने तयार करणेत आलेल्या मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षक मतदारांनाच केवळ मतदान करता येईल.

*मतदारांना आवश्यक सूचना.*
१) मतदान हे मतपत्रिकेवर होणार असून त्यावर उमेदवाराच्या नावासमोर असलेल्या पसंतीक्रमाच्या
रकान्यातच मतदारांनी पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. २) मतदारांनी मतदान केंद्रावर पुरविणेत आलेल्या जांभळ्या शाईच्या पेनानेच मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविणे अनिवार्य आहे.
३) मतपत्रिकेवर पसंतीक्रमाचे आकडे मराठी किंवा इंग्रजी किंवा रोमन या भाषेतील नोंदविणे आवश्यक आहे. मतपत्रिकेवर काही पसंतीक्रम अंकात व काही पसंतीक्रम अक्षरात / शब्दात नमूद केल्यास मतपत्रिका रदद करणेस पात्र ठरेल.
४) मतपत्रिकेवर किमान १’ या अंकाचा पसंतीक्रम नोंदविणे अनिवार्य आहे.
५) मतपत्रिकेवर १ हा अंक एकापेक्षा जास्त उमेदवारांच्या नावासमोर दर्शविल्यास सदर मतपत्रिका अवैध ठरविणेत येईल.
६) उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम दर्शविणेसाठी मतपत्रिकेवर बरोबर (V) किंवा चूक (x) अशी चिन्हे दर्शवल्यास तसेच मतदाराची ओळख पटेल अशा तऱ्हेचे चिन्ह अथवा लिखाण केलेले असल्यास मतपत्रिका अवैध ठरविणेत येईल.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणूकीची मतदान प्रक्रिया निर्भय व मुक्त वातावरणात पार पडणेकरीता मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती केली आहे, तसेच व्हिडीओग्राफी व वेबकास्टींग करणेत येणार आहे.

मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर कोव्होड-१९ च्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे. मतदान संपल्यावर मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामार्फत सर्व मतपेटया पोलीस बंदोबस्तासह जिल्हा मुख्यालय येथे एकत्रित करून जिल्हयांवरुन आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर- २४, पामबीच रोड, नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई येथील मतमोजणीच्या ठिकाणी स्ट्राँग रुममध्ये जमा करण्यात
येणार आहेत.
मतमोजणी गुरुवार दिनांक ०२ फेब्रुवारी, २०२३ रोजी सकाळी ८.०० वाजलेपासून सुरु होईल. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कोकण विभाग शिक्षक मतदार संघ तथा कोंकण विभागाचे उपआयुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.