Home ठळक बातम्या श्रीवर्धनमध्ये भीषण अपघात! तरुणाचा जागीच मृत्यू, 4 जणांना अटक

श्रीवर्धन : संतोष चौकर
श्रीवर्धन शहरातील समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुणे येथून आलेल्या एका पर्यटकांच्या थार गाडीने एका दुचाकी स्वराला जागीच उडवून ठार केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पुणे येथून आलेल्या काळ्या रंगाच्या एका थार गाडीने गाडी क्रमांक एम.एच.12 व्ही.डब्ल्यू 8055 श्रीवर्धन येथील व्यावसायिक परवेज हमदुले हे आपल्या स्कुटी वरून घरी जात असताना मद्य धुंद अवस्थेत असलेल्या पर्यटकांनी चुकीच्या बाजूनी गाडी चालवून त्यांना जोरदार ठोकर दिली व गाडी जवळ जवळ 40 फूट फरफटत पुढे नेली.
अपघात एवढा भयानक होता की, परवेज हमदुले यांचा डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. श्रीवर्धन पोलिसांनी तातडीने या घटनेची दखल घेत गाडी मधील सर्व युवकांना श्रीवर्धन पोलीस ठाण्यात नेले व सदर अपघाताच्या जागी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला. त्यानंतर परवेज हमदुले यांना शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी देखील जमावाने खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जमलेल्या गर्दी कडून श्रीवर्धन शहरातील वाणी परिसरातील मार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु पोलीस प्रशासनाने योग्य भूमिका घेत जमावाचा हा प्रयत्न हाणून पाडला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन शहरामध्ये अतिरिक्त पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.