ताम्हिणी घाटात थार गाडी दरीत कोसळली

0
2

6 जणांचा जागीच मृत्यू

माणगाव : (संतोष सुतार/ गौतम जाधव )
माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताम्हिणी घाटात पोलीस चौकीच्या दोन किलोमीटर अंतरावर तीव्र उतारावर पुण्याहून आलेल्या सहा पर्यटकांची एम एच 12 वाय एन 8004 ही थार गाडी तीव्र उताराचा अंदाज न आल्याने थेट पाचशे ते सहाशे फूट दरीत कोसळली. या मध्ये उत्तमनगर पुणे येथील 6 तरूण 1)साईल साधु गोटे (वय 24),2)शिवा अरूण माने (वय 19), 3)ओकार सुनील कोळी (वय 18),4) श्री महादेव कोळी (वय 18),5)प्रथम रावजी चव्हाण (वय 24),6)पुनीत सुधाकर शेट्टी (वय 20) हे पर्यटनासाठी कोकणात येत असताना त्यांची गाडी खोल दरीत गेल्याने या 6 जणांचा दुर्दैवाने कोकणात पोहोचण्याच्या अगोदरच मृत्यू झाला आहे. सोमवारच्या मध्यरात्री हे तरूण उत्तमनगर येथून हे सहा तरूण कोकणात निघाले होते. आईवडील व नातेवाईक मंगळवारी दिवसभर त्यांना संपर्क करत होते. परंतु त्याचा संपर्क होत नव्हता. त्यावेळी त्यांच्या आईवडीलानी व नातेवाईक यांनी त्यांची सर्व बाजूस शोधाशोध सुरू केली तसेच कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी संपर्क न झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पुणे येथील उत्तमनगर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्यांनी तक्रार दिली असता माणगाव पोलीस स्टेशनला संपर्क करून ही माहिती सांगितली. दोन्ही पोलिस स्टेशन मधून या तरुणांचा शोध सुरू झाला असता गुरुवार 20 नोव्हेंबर रोजी अखेर या तरूणांचा शोध घेतला असता त्यांचा शेवटचा मोबाईल लोकेशन हे ताम्हाणी घाटात सापडले. या ठिकाणी माणगांव पोलिसांमार्फत ड्रोन कॅमे-याच्या माध्यमातून शोध घेतला असता सदरची थार गाडी ही खोल दरीत कोसळल्याचे चित्र कॅमेरात कैद झाल्याने माणगाव पोलिसांनी ही माहिती तात्काळ रेस्क्यू टीमला दिली. शोध मोहीम राबवून या ठिकाणी शोध घेतले असता ही थार गाडी त्याच पर्यटकांची असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली.
या ठिकाणी घटनास्थळी माणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे त्याचबरोबर SVRSS आणि RESQ टीम शेलार मामा रेस्क्यू टीम या घटनास्थळी दाखल होऊन ज्या ठिकाणी थार गाडीचा अपघात झाला आहे अशा ठिकाणी रोपवेच्या साह्याने ते खाली उतरवून शोध घेतला असता या अपघातात थार गाडीत असलेल्या सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. सकाळी 7 वाजल्यापासून ऑपरेशन सुरू केले होते. संध्याकाळी पाच वाजता एक मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
घटनास्थळाचे स्वरूप अत्यंत धोकादायक, दाट जंगल आणि प्रचंड खोलीमुळे शोधकार्य अत्यंत अवघड बनले. कठीण भूभाग, दाट झाडी आणि खोल दरी यामुळे रेस्क्यूला विलंब होत असला तरी पथकांकडून युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
स्थानिक पोलीस, एसडीआरएफ, SVRSS आणि RESQ टीम संयुक्तपणे शोधकार्य करत असून दरीचा कठीण उतार आणि खोलीमुळे पथकांच्या हालचालींना मोठे आव्हान निर्माण झाले. घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.