कर्जत येथे जिल्हा परिषद- पंचायत समिती निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

0
8

रायगड – अलिबाग : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी (दि.24 जानेवारी) रोजी कर्जत येथील उपविभागीय कार्यालयातील निवडणूक कार्यालयास भेट देऊन निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच सुरू असलेल्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, पोलीस उपअधीक्षक राहुल गायकवाड, तहसीलदार धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक उमेश पाटील, गटविकास अधिकारी सुशांत पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार असून सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुस्थितीत खोल्या, शौचालये, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदी मूलभूत सुविधा उपलब्धता याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी स्ट्राँग रूम व निवडणूक साहित्य कक्षाचीही तपासणी केली. तसेच स्वीप कार्यक्रमांतर्गत प्रभावी जनजागृती राबवून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.