Home ठळक बातम्या तीन दिवस लागून सुट्ट्या आल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक; श्रीवर्धन शहरात वाहतूक कोंडी
पोलीस प्रशासन देखील हतबल
श्रीवर्धन : या शनिवारी चौथा शनिवार व रविवार असल्यामुळे दोन दिवस सुट्टी होती. त्यातच सोमवारी 26 जानेवारीची सुट्टी असल्यामुळे श्रीवर्धन परिसरामध्ये पर्यटकांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश घेतल्याने प्रशासनाचे अक्षरशः धाबे दणाणले. असंख्य आलेल्या पर्यटकांच्या संख्येमुळे व त्यांच्या वाहनांमुळे पोलीस प्रशासन देखील हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. कारण पोलिसांनी पार्किंगसाठी श्रीवर्धन येथील र.ना. राऊत विद्यालयाच्या मागील पटांगण ताब्यात घेतले आहे. जेणेकरून शहरातील नागरिकांना पार्किंगचा त्रास होणार नाही.
परंतु सदर ग्राउंड वरती जवळजवळ हजार ते दीड हजार गाड्या उभ्या करून सुद्धा श्रीवर्धन शहरातील अनेक रस्त्यांवरती हजारो वाहने उभी होती. तर श्रीवर्धन येथील स्मशानभूमी असलेल्या मठाच्या परिसरात देखील रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी असल्यामुळे सर्वत्रच वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत होती. अशा प्रचंड वाहतूक कोंडी झालेल्या वेळी, श्रीवर्धन मध्ये एखादी व्यक्ती मरण पावल्यास सदर व्यक्तीची अंतिम यात्रा देखील त्या मार्गावरून स्मशानभूमीपर्यंत नेणे कठीण होऊन बसणार आहे.
श्रीवर्धन मध्ये पार्किंग साठी जागा उपलब्ध असताना या ठिकाणाहून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी म्हणजेच या ठिकाणाच्या आमदारांनी पार्किंगच्या भूमीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्याचे धोरण अवलंबिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडे राज्यातील कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद असून सुद्धा मागील दोन महिन्यांपासून पार्किंगसाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला नाही. पार्किंगच्या समस्ये बरोबरच श्रीवर्धन शहरातील अरुंद रस्ते ही सुद्धा एक मोठी समस्या आहे. तरी शहरातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी लोकांच्या जागेवरती खुणा देखील करण्यात आलेल्या आहेत.
त्यामुळे लवकरात लवकर रुंदीकरण करण्याचा प्रश्न देखील मार्गी लावण्यात यावा. शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण झाले तरच या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सोयीचे होऊन बसणार आहे. व स्थानिकांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. तरी याबाबत रायगडचे खासदार सुनील तटकरे, त्याचप्रमाणे मंत्री अदिती तटकरे यांनी तातडीने याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.