पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी नितीन पाटील आणि उपमहापौरपदी प्रमिला पाटील बिनविरोध

0
2
पनवेल  : पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजप महायुतीचे नितीन जयराम पाटील तर उपमहापौरपदी प्रमिला रविनाथ पाटील यांची  बिनविरोध निवड झाली. शेकाप महाविकासआघाडीकडे पक्षीय बलाबल नसल्याने अखेरी त्यांना आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागले. सार्वत्रिक निवडणुकीत या पूर्वीच दारुण पराभव झाल्याने महापौर उपमहापौर निवडणुकीतसुद्धा नाचक्की होऊ नये यासाठी महाविकास आघाडीला पर्याय शिल्लक राहिला नव्हता. भाजप युतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने या निवडणुकीत फक्त औपचारिकता बाकी होती. निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले होते. यामध्ये ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.
या निवडीनंतर पनवेल शहरात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांच्या आणि ‘एकच वादा प्रशांत दादा’ गजरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महारांच्या अश्वारूढ पुतळ्यास आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पनवेल महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२६ भाजप महायुतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लढवली. या निवडणुकीत भाजपने ५५, शिवसेनेने २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २ जागांवर विजय मिळवत एकूण ५९ जागांसह पनवेल महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजप महायुतीची भक्कम सत्ता प्रस्थापित केली. नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील आणि उपमहापौर प्रमिला पाटील यांनी पनवेल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.या प्रसंगी बोलताना नितीन पाटील यांनी सांगितले की, पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच वाहतूक व्यवस्थेच्या बळकटीकरणावर भर देण्यात येईल. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी पारदर्शक आणि गतिमान प्रशासन देण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण विजयाबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि समस्त मतदार पनवेलकरांचे मनःपूर्वक आभार मानले. सर्वांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.