अत्यावश्यक सेवांना व रस्ते कामांच्या वाहनांना सूट
नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या व परतीच्या भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत व्हावा तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमतेच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले असल्याचे बंदी आदेश परिवहन विभागामार्फत जारी करण्यात आले आहेत.
गणेशोत्सवपूर्व तयारी व मूर्तींचे आगमन लक्षात घेऊन दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ वाजेपासून दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर सर्व वाहनांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा अधिक असलेली जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीअॅक्सल, ट्रेलर, ट्रक, लॉरी आदींची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.
पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनक्षमतेच्या सर्व जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे.
सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जनासाठी व काही अंशी परतीच्या प्रवासासाठी दि. १९ सप्टेंबर, २०२६ रोजी सकाळी ८ वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत आणि दि. २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर सर्व वाहनांची वजनक्षमता १६ टन किंवा १६ टनांपेक्षा अधिक असलेली जड-अवजड वाहने, ट्रक, मल्टीअॅक्सल, ट्रेलर, ट्रक, लॉरी आदींची वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे.