नवी मुंबई : विकसित भारताच्या संकल्पनेतून विकसित महाराष्ट्र घडविताना कोकण विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. ‘तिसरी मुंबई’, वाढवण बंदर, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, आधुनिक पायाभूत सुविधा तसेच कृषी व पर्यटन क्षेत्राला चालना देणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे कोकणच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. हा विकास स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी, मच्छीमार, महिला, युवक आणि पर्यावरणाचे हित केंद्रस्थानी ठेवून शाश्वत पद्धतीने केला जाईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात मंत्री तटकरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी त्या उपस्थितांना मार्गदर्शन करत होत्या. आमदार मंदाताई म्हात्रे, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा, विभागीय अपर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
‘तिसरी मुंबई’मुळे विकासाला गती
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू आणि मुंबई महानगर प्रदेशाशी जोडल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. रायगड-पेण ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून उद्योग, तंत्रज्ञान, फिनटेक, डेटा सेंटर आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे तटकरे यांनी सांगितले.
वाढवण बंदरामुळे आयात-निर्यात व्यापाराला चालना मिळण्यासोबत उद्योग, वाहतूक, सेवा आणि रोजगार क्षेत्रातही मोठ्या संधी निर्माण होतील. स्थानिक युवकांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना या विकासप्रक्रियेत सहभागी करून घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रेवस-रेड्डी महामार्गामुळे दळणवळण सुलभ
रेवस-रेड्डी सागरी महामार्गामुळे कोकणातील दळणवळण अधिक गतिमान होणार असून प्रवासाचा वेळ कमी होईल. पर्यटन, व्यापार तसेच कृषी उत्पादनांच्या वाहतुकीला या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. मोठ्या प्रकल्पांसोबतच स्थानिक नागरिकांचे हित आणि पर्यावरणाचे संरक्षण यांना प्राधान्य देत कोकणचा शाश्वत विकास साधला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आंबा, काजू, सुपारीला मूल्यवर्धन
कोकणातील हापूस आंबा, काजू आणि सुपारीला आधुनिक प्रक्रिया उद्योग, ब्रँडिंग, बाजारपेठ आणि निर्यातीशी जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासोबत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असे तटकरे यांनी नमूद केले.
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट, स्वयंरोजगार, कौशल्यविकास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन दिले जात आहे. तसेच प्रत्येक बालकाला सुरक्षित बालपण, शिक्षण, आरोग्य आणि समान संधी मिळावी यासाठी विविध योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
युवकांनी रोजगार निर्माण करणारे व्हावे
कौशल्यविकास, रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या माध्यमातून कोकणातील युवकांना सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे. युवकांनी केवळ रोजगार मागणारे न राहता रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावे, अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली.
अपराधी परिविक्षा अधिनियमांतर्गत निर्दोष मुक्त झालेल्या, मात्र किमान एक वर्ष कारावासात राहिलेल्या बंद्यांच्या पुनर्वसनासाठी सहाय्यक अनुदान २५ हजारांवरून ५० हजार रुपये करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
जलसंधारण सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन
माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी २१ ऑगस्ट रोजी राज्यात जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सुरू झालेल्या जलसंधारण सप्ताहात तसेच २१ ऑगस्ट रोजी आयोजित ‘महा वॉकेथॉन’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तटकरे यांनी केले.
दरम्यान, कोकण भवन परिसरात ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत शुभेच्छा संदेश फलक लावण्यात आले होते. कोकण भवनाची इमारत तिरंगी रोषणाईने सजविण्यात आली होती.
उत्कृष्ट पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. सीबीडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त मयुर भुजबळ, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे, नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मयुर पवार, वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव रुपवते आणि कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभय काळे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास नवी मुंबई पोलीस सहआयुक्त संजय ऐनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्यासह कोकण विभागातील वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिक, शासकीय कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.