कोंदिवडे गावच्या धाडसी मुलींना राज ठाकरेंकडून कौतुकाची थाप

0
28

व्हायरल व्हिडीओची दखल घेत मनसे प्रमुखांनी घेतली भेट

कर्जत : रायगड जिल्ह्यातील कोंदिवडे येथील शाळकरी मुलींनी गावातील खराब रस्त्यांची दयनीय अवस्था आपल्या अनोख्या आणि उपरोधिक शैलीत मांडणारा व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यांच्या धाडसी आणि निर्भीड भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या व्हिडीओची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज या मुलींची भेट घेतली.
यावेळी राज ठाकरे यांनी कु.नेहा आत्माराम घारे, कु.ज्योत्स्ना रोहिदास मुकणे, कु.मानसी दिनेश पवार या मुलींशी संवाद साधत त्यांच्या धाडसाचे, सामाजिक प्रश्न मांडण्याच्या पद्धतीचे आणि जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याच्या प्रयत्नाचे कौतुक केले. तसेच सर्व मुलींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोंदिवडे गावातील रस्त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुलींनी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये रस्त्यांची झालेली दुरवस्था प्रभावीपणे मांडण्यात आली होती. “रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?” असा सवाल करत त्यांनी प्रशासन आणि संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले. त्यांच्या या व्हिडीओनंतर रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आणि संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामालाही गती मिळाल्याचे वृत्त आहे.
लहान वयातच आपल्या परिसरातील मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधत त्या समस्यांना वाचा फोडण्याचे धाडस या मुलींनी दाखवले आहे. कोणत्याही राजकीय दबावाला किंवा भीतीला बळी न पडता आपल्या गावातील प्रश्न विनोदी, पण तितक्याच प्रभावी पद्धतीने मांडण्याचा त्यांचा प्रयत्न अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या मुलींचे कौतुक होत असतानाच आता थेट राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज ठाकरे यांच्या भेटीवेळी मनसे विद्यार्थी सेना रायगड जिल्हाध्यक्ष प्रसन्न बनसोडे, मनसे रेल्वे सेना अध्यक्ष जितेंद्र पाटील, मनसे कर्जत तालुका उपाध्यक्ष भूषण राणे, मनसे विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष सुयश महागावकर कर्जत यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोंदिवडेच्या या मुलींनी दाखवलेल्या धाडसामुळे “लहान वय, मोठे धाडस आणि सामाजिक भान” याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. आपल्या परिसरातील समस्या केवळ बोलून न दाखवता त्या प्रभावीपणे समाजासमोर मांडण्याची गरज असल्याचा संदेशही या घटनेतून मिळत आहे.