Home ठळक बातम्या माणगांवात जन्मलेल्या चेतना म्हात्रेची हवाई सुंदरी म्हणून आकाशी झेप

उतेखोल / माणगांव, (रविंद्र कुवेसकर)
जिद्द, त्याग, संयम आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर माणगांवात जन्मलेल्या चेतना ज्योत्स्ना चंद्रहास म्हात्रे हिने आपले एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न पूर्ण करत हवाई सुंदरी म्हणून आकाशी झेप घेतली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.
माणगाव येथे जन्मलेली चेतना सध्या पेण (जि. रायगड) येथे वास्तव्यास आहे. लहानपणापासूनच तिने एअर होस्टेस बनण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी संवाद कौशल्य, आत्मविश्वास, संयम, टीमवर्क, सुरक्षिततेची जाणीव आणि प्रवाशांशी समजूतदारपणे वागण्याची क्षमता अशा अनेक निकषांची पूर्तता करावी लागते. यासाठी तिने सातत्याने मेहनत घेतली.
या प्रवासात नवी मुंबई येथील गो एव्हिएटर अकॅडमीमध्ये घेतलेले प्रशिक्षण तिच्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरले. याच प्रशिक्षणातून तिला योग्य दिशा मिळाली. या काळात कुटुंबीयांचा तिला मोठा आधार लाभला. विशेषतः तिची बहीण श्रावणी म्हात्रे हिने प्रत्येक टप्प्यावर तिला प्रोत्साहन दिले. यानंतर इंडिगो एअरलाईन्सच्या मुलाखतीसाठी सुमारे १५० मुली सहभागी झाल्या होत्या. त्यातून चेतनाची निवड झाली. हा क्षण तिच्यासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा ठरला. १६ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षणासाठी ती दिल्लीला रवाना झाली. घरापासून पहिल्यांदाच दूर जात असताना भावनिक क्षण अनुभवावा लागला, मात्र स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द तिच्या मनात होती.
प्रशिक्षणादरम्यान ऑनबोर्ड इक्विपमेंट्स, एव्हिएशन सेफ्टी, फर्स्ट एड, फायर फायटिंग, एव्हिएशन सिक्युरिटी, कम्युनिकेशन स्किल्स, कस्टमर सर्व्हिस तसेच सेल्फ डिफेन्स यांसारख्या विषयांचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक मॉड्यूलनंतर परीक्षाही घेण्यात येत होत्या आणि त्यामध्ये किमान ९० टक्के गुण मिळवणे आवश्यक होते. या प्रशिक्षणानंतर चेतना केवळ एअर होस्टेस म्हणून नव्हे तर प्रमाणित प्रथमोपचार सहाय्यक, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास सक्षम कर्मचारी, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणारी प्रशिक्षित व्यावसायिक म्हणून घडली. अखेर १६ जानेवारी रोजी प्रशिक्षण पूर्ण करून तिला अधिकृतपणे एअर होस्टेस म्हणून ‘पंख’ मिळाले. गणवेश परिधान करून तिने कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉल केला तेव्हा सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. आपल्या यशाबद्दल चेतना म्हणाली, “हा प्रवास स्वतःची स्तुती करणारा नसून प्रयत्न, कुटुंबाचा आधार आणि हार न मानण्याची कहाणी आहे. स्वप्न पूर्ण झाले असे म्हणण्यापेक्षा आता एक नवीन जबाबदारी सुरू झाली आहे.” दहावी-बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी तिच्या या जिद्दीच्या प्रवासातून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले जात आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील या कन्येच्या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे.