पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व यंत्रणा २४ x ७ अलर्टवर; नागरिकांना दोन दिवस घराबाहेर न पडण्याचे आवाहन

0
6

मुंबई  : राज्यातील मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय यंत्रणांना २४x७ ‘अलर्ट मोड’वर राहण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षातून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय पुढील दोन दिवस घराबाहेर पडू नये, तसेच शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करावा, असे आवाहन केले. खाजगी आस्थापनांनीही कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी, अन्यथा कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईसह किनारी भागात ताशी ५० ते ७० किमी वेगाने वारे आणि समुद्रात उच्च भरतीची शक्यता असल्याने एसडीआरएफ व एनडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई-अहमदाबाद व मुंबई-गोवा महामार्गावरील दरडी व मलबा तातडीने हटवून वाहतूक सुरळीत ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे ३०० मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पर्यटकांनी पुढील काही दिवस त्र्यंबकेश्वरला जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाला पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी पुढील ४८ तास ‘शून्य बळी’ हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी कमाल सतर्कता बाळगावी आणि अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत पोहोचवावी, असे निर्देश दिले. तसेच ८ जुलैपर्यंत हवामानाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता असल्याने सर्व जिल्हा प्रशासनाला सज्ज राहण्यास सांगितले आहे.