चक्रीवादळाचा तडाखा; जेएनपीए बंदरात कंटेनर उडाले

0
1

तीन कामगार जखमी; दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती
उरण, दि. ६ (वार्ताहर) : उरण तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वेगवान वादळी वाऱ्यांनी हाहाकार माजविला असतानाच जेएनपीए बंदरातील न्हावा शेवा फिपोर्ट टर्मिनलमध्ये सोमवारी (दि. ६) सकाळी गंभीर अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. जहाजावरील कंटेनर उतरविण्याच्या कामादरम्यान चक्रीवादळसदृश वाऱ्यांच्या तडाख्यामुळे कंटेनर उडाल्याने तीन कामगार जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कामगार जहाजावरील कंटेनर उतरविण्याचे काम करीत होते. त्याचवेळी अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे काही कंटेनर अस्थिर झाले. या घटनेत तीन कामगार जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, उरण तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसासह वेगवान वारे वाहत आहेत. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळित झाले असून रस्ते, सखल भाग आणि किनारी परिसर जलमय झाला आहे. अशा परिस्थितीत बंदर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच आवश्यक बचाव सुविधा तातडीने उपलब्ध न झाल्याची नाराजी काही कामगारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बंदरातील कामगार वर्गात अस्वस्थता आणि नैराश्याचे वातावरण पसरल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेसंदर्भात अधिकृत माहिती घेण्यासाठी जेएनपीए प्रशासनातील अधिकारी, रायगड जिल्हाधिकारी डॉ. किसन जावळे तसेच उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वृत्त लिहीपर्यंत त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नव्हती.